महात्मा फुले मंडईतील गाळ्यांच्या भाडेवाढीचा पुनर्विचार करा; गाळेधारकांना विश्वासात घेऊनच निर्णय घ्या – नगरसेवक राघवेंद्र (बाप्पू) मानकर

पुणे : पुणे शहरातील ऐतिहासिक महात्मा फुले मंडईतील सुमारे २२०० गाळेधारकांवर करण्यात आलेल्या भाडेवाढीचा पुनर्विचार करून, गाळेधारकांची आर्थिक परिस्थिती आणि व्यवसायातील अडचणी लक्षात घेऊन न्याय्य व परवडणारे भाडे निश्चित करण्यात यावे, अशी मागणी पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक तथा विश्रामबागवाडा प्रभाग समितीचे अध्यक्ष राघवेंद्र (बाप्पू) मानकर यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांना लेखी निवेदन सादर केले.

मानकर यांनी निवेदनात नमूद केले आहे की, कोविड-१९ महामारी, दीर्घकालीन लॉकडाऊन, ग्राहकसंख्येतील घट तसेच मंडई परिसरातील मेट्रोसह विविध विकासकामांमुळे व्यापाऱ्यांच्या व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. अनेक गाळेधारक अद्यापही आर्थिक अडचणीतून पूर्णपणे सावरलेले नसताना वाढीव भाड्याचा अतिरिक्त भार त्यांच्यावर टाकणे अन्यायकारक ठरेल.

यावेळी महात्मा फुले मंडई व्यापारी संघटनेचे अध्यक्ष राजाभाऊ कासूर्डे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. गाळेधारकांचे म्हणणे ऐकून घेतल्याशिवाय कोणताही अंतिम निर्णय घेऊ नये, अशी मागणी व्यापाऱ्यांच्या वतीने करण्यात आली.

मानकर यांनी प्रशासनाला आवाहन करताना सांगितले की, भाडेनिश्चिती करण्यापूर्वी गाळेधारकांच्या प्रतिनिधींशी सविस्तर चर्चा करण्यात यावी. तसेच कोरोना काळामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या व्यापाऱ्यांच्या २०२१ ते २०२५ या कालावधीतील थकीत भाड्याबाबत सहानुभूतीपूर्वक विचार करून सवलत द्यावी आणि थकीत रक्कम हप्त्यांमध्ये भरण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी.

याशिवाय मुंबई आणि दिल्ली महानगरपालिकांमधील भाडेनिश्चितीच्या पद्धतीचा अभ्यास करून त्यानुसार न्याय्य धोरण अवलंबावे, अशीही सूचना त्यांनी केली.

राघवेंद्र (बाप्पू) मानकर म्हणाले, “महात्मा फुले मंडईचे ऐतिहासिक वैभव जपणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच अनेक वर्षांपासून येथे व्यवसाय करणाऱ्या गाळेधारकांचे हित जपणेही आवश्यक आहे. व्यापाऱ्यांवर एकतर्फी आर्थिक भार न टाकता त्यांना विश्वासात घेऊन न्याय्य निर्णय घ्यावा, ही आमची भूमिका आहे.”

व्यापाऱ्यांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करून भाडेवाढीचा निर्णय फेरविचारासाठी घ्यावा, अशी अपेक्षा गाळेधारकांनी व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button