
सुहास टिंगरे यांच्या प्रस्तावाला मंजुरी; दिवसाआड पाणीपुरवठा सुरू झाल्यापासून चारा व पाण्याची सुविधा उपलब्ध करण्याची मागणी
पुणे, प्रतिनिधी : पुणे शहरातील बेवारस आणि भटक्या गोवंशीय जनावरांच्या अन्न-पाण्याची गैरसोय टाळण्यासाठी तात्पुरत्या चारा छावण्या सुरू कराव्यात. तसेच सार्वजनिक ठिकाणी मोफत स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, असा प्रस्ताव नगरसेवक आणि स्थायी समिती सदस्य सुहास विजय टिंगरे यांनी मांडला होता. या प्रस्तावाला पुणे महापालिकेच्या स्थायी समितीने मान्यता दिली आहे.
शहरात ३२ गावांचा समावेश झाल्यानंतर बेवारस व भटक्या जनावरांसाठी कायमस्वरूपी सुसज्ज गोशाळा उभारण्याचा प्रस्ताव टिंगरे यांनी यापूर्वी मांडला होता. त्याला मुख्य सभेने मान्यता दिल्याचे त्यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे. मात्र, गोशाळांची प्रत्यक्ष उभारणी होईपर्यंत जनावरांच्या चारा आणि पाण्याची व्यवस्था करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
जनावरांसाठी तात्पुरत्या चारा छावण्या
शहरातील ज्या भागांमध्ये बेवारस आणि भटक्या जनावरांची संख्या अधिक आहे, तेथे तातडीने तात्पुरत्या चारा छावण्या सुरू कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. संभाव्य पाणीटंचाईच्या काळात जनावरांना अन्न आणि पाण्याअभावी त्रास होऊ नये, हा या उपक्रमामागील उद्देश असल्याचे टिंगरे यांनी म्हटले आहे.
चौक आणि सार्वजनिक ठिकाणी पाण्याची सोय
शहरातील विविध चौक, मोकळ्या जागा आणि जनावरांचा वावर असलेल्या सार्वजनिक ठिकाणी स्वच्छ पिण्याच्या पाण्याची भांडी किंवा टाक्या ठेवण्यात याव्यात. ही सुविधा जनावरांना मोफत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणीही प्रस्तावात करण्यात आली आहे.
दिवसाआड पाणीपुरवठा सुरू होताच अंमलबजावणी
पुणे शहरात ज्या दिवसापासून दिवसाआड पाणीपुरवठा सुरू होईल, त्याच दिवसापासून चारा छावण्या आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था प्रत्यक्षात सुरू करावी, अशी सूचना टिंगरे यांनी केली आहे.
या उपक्रमाच्या नियोजनासाठी गोशाळा संस्था, गोसेवा संस्था, गोरक्षक आणि पशुप्रेमी स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य घेण्याचेही सुचवण्यात आले आहे.
जागा, मनुष्यबळ आणि निधी उपलब्ध करण्याची मागणी
भटक्या जनावरांचे संरक्षण आणि संगोपन ही महापालिकेची सामाजिक जबाबदारी असल्याचे टिंगरे यांनी नमूद केले आहे. त्यामुळे या उपक्रमासाठी आवश्यक जागा, मनुष्यबळ आणि आर्थिक तरतूद प्रशासनाने उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
स्थायी समितीच्या मान्यतेनंतर आता या सुविधांची प्रत्यक्ष अंमलबजावणी कधी आणि कोणत्या ठिकाणी सुरू होणार, याकडे शहरातील पशुप्रेमी आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे.