
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याचा ठराव स्थायी समितीत मंजूर; लवकरच मुख्य सभेसमोर येणार
पुणे, दि. ३० ऑक्टोबर २०२६ : प्रतिनिधी
पुणे कराराच्या ऐतिहासिक वारशाचे जतन करण्यासह भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. नगरसेवक तथा स्थायी समिती सदस्य सुहास विजय टिंगरे यांनी सूचक म्हणून मांडलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यासंदर्भातील ठरावाला स्थायी समितीने मान्यता दिली आहे. आता हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी पुणे महापालिकेच्या मुख्य सभेसमोर मांडण्यात येणार आहे.
पुणे करार हा भारतीय सामाजिक आणि राजकीय इतिहासातील महत्त्वाचा टप्पा मानला जातो. या करारामुळे सामाजिक प्रतिनिधित्व, समता आणि वंचित घटकांच्या हक्कांच्या प्रश्नांना ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले. या घटनेचा इतिहास आणि त्यामागील विचार पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी पुणे कराराच्या स्मृती जतन करण्याची आवश्यकता आहे.
पुणे कराराचा इतिहास आणि बाबासाहेबांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचणार
याच उद्देशाने सुहास विजय टिंगरे यांनी पुणे कराराचा ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी ठराव मांडला होता. या प्रस्तावात पुणे कराराच्या ऐतिहासिक महत्त्वाचे जतन, स्मारक आणि संग्रहालयाच्या संकल्पनेला चालना, ऐतिहासिक दस्तऐवजांचे संरक्षण तसेच नव्या पिढीला या घटनेची माहिती उपलब्ध करून देण्यासारख्या बाबींवर भर देण्यात आला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेला समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि सामाजिक न्यायाचा संदेश समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावा, यासाठी अशा ऐतिहासिक उपक्रमांची गरज असल्याचे प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे.
स्थायी समितीची मान्यता; आता मुख्य सभेच्या निर्णयाकडे लक्ष
सुहास टिंगरे यांनी सूचक म्हणून मांडलेल्या या ठरावाला स्थायी समितीने मान्यता दिल्याने प्रस्तावाच्या पुढील प्रक्रियेला गती मिळाली आहे. लवकरच हा ठराव पुणे महानगरपालिकेच्या मुख्य सभेसमोर मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे.
मुख्य सभेची मंजुरी मिळाल्यानंतर पुतळा उभारणी आणि पुणे कराराच्या ऐतिहासिक वारशाच्या जतनासंदर्भातील पुढील प्रशासकीय कार्यवाहीचा मार्ग मोकळा होणार आहे.
पुणे शहराचा ऐतिहासिक वारसा जतन करणे, महापुरुषांच्या विचारांचा सन्मान करणे आणि सामाजिक समतेचा संदेश व्यापक स्वरूपात समाजापर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने हा प्रस्ताव महत्त्वाचा ठरणार आहे.