
नगरसेवक सुहास टिंगरे यांच्या मागणीला स्थायी समितीची मंजुरी; सणासुदीच्या काळात नागरिकांची गैरसोय टळणार
पुणे : प्रतिनिधी
दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर पुणेकरांना दिलासा देण्यासाठी गुरुवारी करण्यात येणारी साप्ताहिक पाणी कपात शिथिल करण्याच्या मागणीला पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीने मान्यता दिली आहे. नगरसेवक आणि स्थायी समितीचे सदस्य सुहास टिंगरे यांनी महापौर व महापालिका आयुक्त यांच्याकडे निवेदनाद्वारे ही मागणी केली होती.
दिवाळी हा आनंदाचा आणि उत्साहाचा सण आहे. या काळात नागरिकांकडून घरांची स्वच्छता, रंगरंगोटी आणि सणाच्या तयारीची विविध कामे केली जातात. त्यामुळे नेहमीपेक्षा अधिक पाण्याची गरज भासते. तसेच, शाळांना दिवाळीच्या सुट्ट्या असल्याने मुलांच्या उपस्थितीत घरातील स्वच्छता आणि इतर कामांचे नियोजन केले जाते.
ही बाब लक्षात घेऊन दिवाळीच्या काळात गुरुवारची साप्ताहिक पाणी कपात शिथिल करावी आणि नागरिकांना पुरेसा पाणीपुरवठा करावा, अशी मागणी सुहास टिंगरे यांनी प्रशासनाकडे केली होती.
स्थायी समितीची मागणीला मान्यता
पुणेकरांच्या दैनंदिन गरजा आणि सणासुदीच्या काळातील पाण्याची वाढती आवश्यकता लक्षात घेऊन टिंगरे यांनी केलेल्या मागणीला स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता मिळाली. त्यामुळे दिवाळीच्या काळात नागरिकांची पाण्याअभावी होणारी गैरसोय कमी होण्यास मदत होणार आहे.
या निर्णयाबद्दल सुहास टिंगरे यांनी समाधान व्यक्त केले. दिवाळीचा सण नागरिकांना आनंदात आणि कोणत्याही गैरसोयीशिवाय साजरा करता यावा, यासाठी महापालिकेने सकारात्मक भूमिका घेतल्याचे त्यांनी नमूद केले.
नागरिकांच्या दैनंदिन गरजा, मुलांच्या शाळेच्या सुट्ट्या आणि सणासुदीच्या काळातील पाण्याची आवश्यकता लक्षात घेऊन घेतलेला हा निर्णय पुणेकरांसाठी दिलासादायक ठरणार आहे.