अजित पवार यांना मरणोत्तर पद्मविभूषण देण्याची मागणी; आमदार विक्रम काकडे यांनी अमित शाह यांना दिले निवेदन


पुणे | महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राज्याच्या विकासातील चार दशकांच्या योगदानाची दखल घेत त्यांना मरणोत्तर ‘पद्मविभूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार विक्रम काकडे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे केली आहे. यासाठी त्यांनी नवी दिल्ली येथे शाह यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.

आमदार काकडे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अजित पवार यांनी गेल्या चार दशकांत महाराष्ट्राच्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. आमदार, खासदार आणि उपमुख्यमंत्री या विविध जबाबदाऱ्यांमध्ये काम करताना त्यांनी अर्थ व नियोजन, जलसंधारण, ऊर्जा, ग्रामीण विकास, कृषी यांसारख्या महत्त्वाच्या विभागांमध्ये उल्लेखनीय योगदान दिले.

त्यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील ग्रामीण तसेच शहरी भागात अनेक विकासकामे आणि लोककल्याणकारी प्रकल्प राबविण्यात आले. दूरदृष्टी, प्रभावी प्रशासन आणि त्वरित निर्णयक्षमता यामुळे ते राज्याच्या राजकारणातील प्रभावी नेतृत्व म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या कार्यातून पुढील अनेक पिढ्यांना प्रेरणा मिळत राहील, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

आमदार काकडे यांनी केंद्र सरकारने अजित पवार यांच्या कार्याचा गौरव करत त्यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार प्रदान करावा, अशी विनंती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे केली आहे.

यावर्षी जानेवारी महिन्यात झालेल्या विमान अपघातात अजित पवार यांचे निधन झाले होते. त्यांच्या निधनानंतर राज्यभरातून हळहळ व्यक्त करण्यात आली होती. स्पष्टवक्तेपणा, कामाचा धडाका आणि विकासाभिमुख नेतृत्वामुळे त्यांनी राज्याच्या राजकारणात वेगळी ओळख निर्माण केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button