महापालिकेच्या ₹३५ कोटींच्या थकीत भाड्याच्या वसुलीसाठी विशेष मोहीम राबवा -श्रीनाथ भिमाले

पुणे, ता. ३ : पुणे महानगरपालिकेच्या मालकीच्या मालमत्तांवरील ₹३५ कोटींहून अधिक थकीत भाड्याची प्रभावी वसुली करण्यासाठी विशेष मोहीम राबवावी, असे निर्देश स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी महसूल वाढ समितीच्या बैठकीत प्रशासनाला दिले.

भिमाले म्हणाले, “सर्व थकबाकीदारांना ३० दिवसांच्या आत अंतिम नोटिसा बजावाव्यात. जाणीवपूर्वक थकबाकी ठेवणाऱ्या भाडेकरूंवर दंडासह कायदेशीर कारवाई तातडीने सुरू करावी. महापालिकेच्या मालमत्तांपासून मिळणारा महसूल हा शहराच्या विकासासाठी महत्त्वाचा असल्याने वसुलीत कोणतीही दिरंगाई सहन केली जाणार नाही.”

ते पुढे म्हणाले, “मालमत्ता व्यवस्थापन अधिक पारदर्शक करण्यासाठी सर्व मालमत्तांचे डिजिटल ऑडिट करावे. थकबाकी, करार आणि प्रत्यक्ष वापराचा आढावा घेऊन बाजारभावानुसार सर्व करारांचे पुनर्मूल्यांकन करावे. आवश्यक तेथे सुधारित करार करून महापालिकेच्या महसुलात वाढ करण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात.”

पुणे महानगरपालिकेच्या मालकीच्या १,९३२ सदनिका, २६३ इमारती आणि १,५५२ मोकळ्या जागा असून, त्यापैकी २,४०७ मालमत्तांवर तब्बल ₹३५ कोटी ४४ लाख २८ हजार ६९० इतकी भाडे थकबाकी आहे. सर्वाधिक थकबाकी मोकळ्या जागांच्या भाड्याची असून त्यानंतर सदनिका आणि इमारतींचा क्रम लागतो. अनेक वर्षांपासून प्रभावी वसुली न झाल्यामुळे महापालिकेचे आर्थिक नुकसान होत असून, नियमित भाडे भरणाऱ्या भाडेकरूंवर अन्याय होत असल्याचेही या आढाव्यात समोर आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button