
रस्ते, पाणी व पायाभूत सुविधांच्या संकटाची चालवलेली तलवार पुणे शहराला नजीकच्या काळात भेडसावणारी..!
वास्तु विशारद, नगररचनाकार आणि विविध क्षेत्रातील तज्ञांचे मत
राजीव गांधी स्मारक समितीच्या वतीने पुणे महानगराचा विकास सुनियोजित पद्धतीने आणि नगर नियोजन विभागाच्या निर्देशानुसार, टीपी व डीपी, एम. आर.टीपी ऍक्ट नुसार होत आहे का(?) याचा मागोवा घेणाऱ्या परिसंवादाचे आयोजन
पुणे दि. 11 ( प्रतिनिधी ) – जागतिक शहरांशी स्पर्धा करणाऱ्या पुणे शहराचे शहरीकरण अस्ताव्यस्त आणि विकास नियोजन शून्य झाला आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिक प्राथमिक गरजांसाठी आजही झगडत आहे . दिवसेंदिवस या समस्या अधिकच वाढत आहे. दिशाहीन नियोजनामुळे हे शहर बकाल झाले असून वेळीच यासंदर्भात उपाययोजना केल्या नाहीत तर हे शहर राहण्यायोग्यही असणार नाही, आणि यासाठी पुढील पिढी मात्र आपल्याला माफ करणार नाही अशी भावना वास्तु विशारद , नगर रचनाकार आणि विविध क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केली.
पुणे महानगराचा विकास सुनियोजित पद्धतीने आणि नगर नियोजन विभागाच्या निर्देशानुसार, टीपी व डीपी नुसार होत आहे का(?) याचा मागोवा घेणाऱ्या परिसंवादाचे आयोजन ‘राजीव गांधी स्मारक समितीच्या’ वतीने करण्यात आले.
यामध्ये तज्ज्ञांनी पुणे शहराच्या विकासासंदर्भात भूमिका मांडली. या परिसंवादामध्ये माजी खासदार अॅड. वंदना चव्हाण, माजी महापालिका आयुक्त महेश झगडे, माजी महापौर, कॉँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष (पूर्व विभाग ) प्रशांत जगताप, शिवसेना उबाठा गटानेते नितीन गावडे ,पर्यावरण तज्ज्ञ सारंग यादवाडकर, सीओइपी’चे माजी प्रा. प्रताप रावळ, वास्तु विशारद मकरंद शेंडे, संग्राम खोपडे, पर्यावरण तज्ज्ञ प्राजक्ता दिवेकर, वास्तु विशारद शिरीष केंभावी, सहकारी गृहनिर्माण सोसायटी महासंघाचे सुहास पटवर्धन आदि सहभागी झाले होते.
राजीव गांधी स्मारक समितीचे अध्यक्ष गोपाळदादा तिवारी यांच्यासह समितीचे सदस्य ही उपस्थित होते.
अॅड. वंदना चव्हाण म्हणाल्या , पुणे शहरावर अगोदरच शहरीकरणामुळे मोठ्या समस्यांचा बोजा आहे, त्यावर लोकसंख्या वाढीमुळे अधिक नागरी समस्या दररोज निर्माण होत आहेत . यासंदर्भात मी मुख्यमंत्री आणि संबंधित विभागांशी अनेक वेळा पत्र व्यवहार केला परंतु त्यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही. अशाच लोकांमुळे उद्या जर हे शहर राहण्यासाठीही योग्य नसेल तर उद्याची पिढी आपल्याला माफ करणार नाही.
माजी आयुक्त महेश झगडे म्हणाले,
पी एम आर डी एम क्षेत्रामध्ये बेसुमार बांधकाम परवानगी, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर झालेली बांधकामे आणि वाढलेली लोकसंख्या यामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी, रस्ते, स्वच्छता या संदर्भात नागरिक समस्या वाढल्या आहेत. याला जबाबदार नगर विकास सचिव आणि महापालिका आयुक्त आहेत याचा जबाब नागरिकांनी त्यांना विचारणे गरजेचे आहे.
प्राजक्ता दिवेकर म्हणाल्या, वेताळ टेकडीवर येत्या काही वर्षांमध्ये तीन मोठे वाहतुकीचे प्रकल्प येणार आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पर्यावरणाची हानी होणार आहे त्यामुळेच या भागातील नागरिक वेताळ टेकडी वाचवण्यासाठी एकत्र आले आहे.
शिरीष केंभवी म्हणाले,
प्रत्येक शहराची भौगोलिक आणि सामाजिक रचना वेगवेगळ्या असते, त्यानुसार त्या शहरांमध्ये विकास योजना राबवल्या पाहिजेत परंतु सर्व शहरांचा विकास एकाच साच्यामध्ये करण्याचा अट्टाहास कशासाठी आहे हा प्रश्न पडतो.
संग्राम खोपडे म्हणाले , शहरातील नागरी समस्या संदर्भात नागरिकच जागरूक नसणे ही मोठी शोकांतिका आहे. वाहतूक समस्या हा कधीही या शहराचा निवडणुकीचा मुद्दा झाला नाही यावरूनच या शहरातील नागरिकांना या शहराबद्दल किती प्रेम आहे हे दिसून येते. ही परिस्थिती बदलण्यासाठी नागरिकांमध्ये प्रत्यक्ष सहभागी होऊन जनजागृती केली पाहिजे.
सुहास पटवर्धन म्हणाले, पुणे शहरांमध्ये 26500 सहकारी गृहनिर्माण सोसायटी आहेत तर संपूर्ण राज्यांमध्ये सव्वा लाख सोसायटी आहेत . बांधकाम परवानगी आणि सोसायट्यांचे पुनर्विकास या संदर्भात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार बोकाळला आहे. पुनर्विकास प्रक्रियेमध्ये पारदर्शकता आली तर ही प्रक्रिया अधिक सुसह्य होऊ शकेल.
प्रताप रावळ म्हणाले, पुण्याचा विस्तार प्रचंड वेगाने झाला आहे. पुणे महापालिकेचे नियोजन प्रत्यक्ष टाऊन प्लॅनर करत नाही तर ते पारंपारिक पद्धतीने सिव्हिल इंजिनिअर कडून करण्यात येते त्यामुळे वर्षानुवर्षाच्या नागरिक समस्या तशाच आहेत.
वास्तुविशारद मकरंद शेंडे म्हणाले ,या विषयावर तज्ज्ञ मंडळी संकट दिसत असून गप्प आहेत,सुजाण न…