
कला, गायन, वादन, नृत्य, संगीत, साहित्य व क्रीडा यांचा मनोहारी संगम असणाऱ्या ३८ व्या पुणे फेस्टिव्हलमध्ये ज्येष्ठ गायिका अनुराधा मराठे, ज्येष्ठ कीर्तनकार चारुदत्त आफळे आणि बालभारती संस्था यांचे विशेष सत्कार आयोजित करण्यात आले आहेत. श्री. गणेश प्रतिष्ठापनेनंतर सलग ३ दिवस पत्रकार भवन, नवी पेठ, पुणे येथे रोज सकाळी १०.३० वाजता हे सत्कार समारंभ संपन्न होतील.
मंगळवार दि. १५ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता पत्रकार भवन येथे प्रख्यात मराठी सुगम संगीत गायिका अनुराधा मराठे यांचा ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त विशेष सत्कार आयोजित करण्यात आला आहे. सन्मानचिन्ह, शाल, साडी व श्रीफळ असे सन्मानाचे स्वरूप आहे. पुणे फेस्टिव्हलचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांच्या हस्ते सत्कार संपन्न होईल. या कार्यक्रमात अनुराधा मराठे यांच्या संगीत जीवनावर आधारित त्यांची प्रकट मुलाखत घेतली जाणार असून ज्येष्ठ निवेदिका मंजिरी धामणकर ही विशेष मुलाखत घेतील.
दरवर्षी पुणे फेस्टिव्हलमध्ये कीर्तन महोत्सव आयोजित केला जातो. यंदाचे याचे सहावे वर्ष आहे. यंदा महाराष्ट्राची नारदीय कीर्तन परंपरा समर्थपणे पुढे नेणारे ज्येष्ठ कीर्तनकार ह. भ. प. चारुदत्त आफळे यांचा विशेष सन्मान बुधवार दि. १६ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता पत्रकार भवन येथे आयोजित करण्यात आला आहे. सन्मानचिन्ह, पुणेरी पगडी, शाल व श्रीफळ असे सन्मानाचे स्वरूप आहे. याप्रसंगी श्री हरि कीर्तनोत्तेजक सभेचे विश्वस्त कीर्तन कलानिधी, कीर्तन केसरी ह. भ. प. रामचंद्र प्रभाकर भिडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. या कार्यक्रमात प्रारंभी युवा कीर्तनकार सौ. तन्मयी मेहेंदळे कुलकर्णी नांदी सादर करणार असून ज्येष्ठ कीर्तनकार ह. भ. प. निवेदिता मेहेंदळे ‘श्री. गणेश उपासना’ कीर्तन सादर करतील.
‘बालभारती’ महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ ही महाराष्ट्रातील शालेय पाठ्यपुस्तके व अभ्यासक्रम तयार करणारी शासनाची मुख्य संस्था आहे. याची स्थापना २७ जानेवारी १९६७ रोजी झाली असून यंदा ‘बालभारती’चे ६० वे वर्ष साजरे होत आहे. बालभारती तर्फे मराठी, इंग्रजी, हिंदी, उर्दू, कन्नड, तेलुगू, सिंधी व गुजराती अशा ८ भाषांमध्ये दरवर्षी कोट्यावधी पुस्तके प्रकाशित व वितरीत होतात. ‘बालभारती’च्या या अद्वितीय योगदानाबद्दल पुणे फेस्टिव्हल तर्फे बालभारती संस्थेचा सत्कार गुरुवार दि. १७ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता पत्रकार भवन येथे आयोजित करण्यात आला आहे. ‘बालभारती’च्या संचालिका मा. अनुराधा ओक हा सत्कार स्वीकारतील. ज्येष्ठ विचारवंत उल्हास पवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील.
ही माहिती पुणे फेस्टिव्हलचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, जनरल सेक्रेटरी व सांस्कृतिक कार्यक्रम मुख्य संयोजक डॉ. सतीश देसाई व विश्वस्त मोहन टिल्लू यांनी पत्रकार परिषदेत दिली.