पुणे मनपात २२ जुलैपासून ‘स्वच्छता अभियान सप्ताह’ राबविण्याचा प्रस्ताव; सुहास टिंगरे व अमोल बालवडकरांचा पुढाकार

पुणे, दि. १६ जुलै : पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत २२ जुलैपासून ‘स्वच्छता अभियान सप्ताह’ राबविण्याचा संयुक्त ठराव स्थायी समिती सदस्य सुहास टिंगरे आणि अमोल बालवडकर यांनी स्थायी समितीत सादर केला आहे. महाराष्ट्र शासनाने स्वर्गीय अजितदादा पवार यांची जयंती २२ जुलै रोजी राज्यभर साजरी करण्याचा निर्णय घेतल्याच्या पार्श्वभूमीवर हा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.

ठरावानुसार, स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या स्वच्छता, शिस्त, टापटीप आणि प्रभावी प्रशासनाच्या कार्यशैलीला अभिवादन करण्यासाठी पुणे शहरात विशेष स्वच्छता अभियान राबविण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

या अभियानाअंतर्गत महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांमार्फत सार्वजनिक रस्ते, पदपथ, चौक, शाळा, उद्याने, सार्वजनिक शौचालये, नाले, कचरा संकलन केंद्रे तसेच इतर सार्वजनिक ठिकाणांची विशेष स्वच्छता केली जाईल, असा प्रस्ताव आहे.

यासोबतच नागरिक, स्वयंसेवी संस्था, शैक्षणिक संस्था, व्यापारी संघटना, गृहनिर्माण संस्था आणि विविध सामाजिक संघटनांच्या सहभागातून स्वच्छता, कचरा वर्गीकरण, पर्यावरण संवर्धन आणि सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवण्याबाबत जनजागृती करण्याचाही प्रस्तावात समावेश आहे.

याबाबत बोलताना स्थायी समिती सदस्य सुहास टिंगरे आणि अमोल बालवडकर यांनी सांगितले की, स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या स्मृतींना खरी आदरांजली म्हणजे त्यांच्या स्वच्छ, शिस्तबद्ध आणि विकासाभिमुख कार्यपद्धतीचे कृतीतून अनुकरण करणे होय. या अभियानामुळे पुणे शहर अधिक स्वच्छ, सुंदर आणि नागरिकाभिमुख होण्यास निश्चितच मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button