पहिल्यांदा आजीच्या शेजारी उभी राहून गायली… आता त्याच आजीची रचना जगासमोर घेऊन आल्या प्रियांका बर्वे

मुंबई | जुलै २०२६

प्रियांका बर्वे पहिल्यांदा रंगमंचावर उभ्या राहिली , तेव्हा ती अवघ्या चार वर्षांच्या होती . गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम होता. “मीही गाणार,” असा हट्ट करत ती आपली आजी विदुषी मालती पांडे बर्वे यांच्या शेजारी जाऊन बसली . त्या क्षणी तिला एवढंच माहीत होतं की त्या आपल्या आजीसोबत गात आहेत. पुढे हीच तिची आजी तिच्या आयुष्यातील पहिली गुरू ठरेल आणि अनेक वर्षांनी तिचीच एक अप्रकाशित रचना गायिका प्रियांका बर्वे जगासमोर आणेल , याची कल्पनाही तिला नव्हती.

यंदाच्या आषाढी वारीच्या निमित्ताने प्गायिका रियांका बर्वे हिने‘विठाई’ या तीन भक्तिगीतांच्या संगीतप्रकल्पातील पहिले गीत ‘विठ्ठलाचे भेटी’ प्रकाशित केले आहे. हा केवळ नव्या गाण्याचा शुभारंभ नाही; तर दिवंगत विदुषी मालती पांडे बर्वे यांच्या एका मूळ रचनेचा प्रथमच सार्वजनिक परिचय आहे. अनेक दशकं ही रचना कुटुंबाच्या जपणुकीत राहिली. आता ती प्रथमच रसिकांपर्यंत पोहोचत आहे.

प्रियांका अवघी सात वर्षाची असतानाच आजींचे निधन झाले. सहवास फार काळाचा नव्हता; पण संगीताचे संस्कार मात्र आयुष्यभर सोबत राहिले. पहाटेच्या रियाजाने जाग येणारे घर, शिकण्यासाठी येणारे शिष्य, सुरांनी भरलेले वातावरण आणि घरात सहज वावर असलेले सुधीर फडके, श्रीनिवास खळे, गजाननराव वाटवे आणि प्रभाकर जोग यांसारखे दिग्गज… संगीत हे तिच्यासाठी वेगळे काही नव्हते; ते घरच्या श्वासासारखेच नैसर्गिक होते.

काळ पुढे सरकला. आठवणी मागे राहिल्या. पण त्या घरात ऐकलेले सूर मात्र शांतपणे जपले गेले.

आज ‘विठाई’ च्या निमित्ताने तेच सूर पुन्हा एकदा प्रवासाला निघाले आहेत. अनेक वर्षे कुटुंबाच्या आठवणींमध्ये आणि जपणुकीत राहिलेली एक रचना आता प्रथमच रसिकांच्या भेटीला आली आहे.

‘विठाई’ समजून घ्यायची असेल, तर तिच्या सुरुवातीला उभ्या असलेल्या व्यक्तीकडे पाहावं लागेल… विदुषी मालती पांडे बर्वे.

हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या अभ्यासू गायिका, संगीतकार आणि गुरू म्हणून त्यांनी आयुष्यभर संगीताची साधना केली. पुढच्या काळात दम्याच्या त्रासामुळे सार्वजनिक मैफिली थांबल्या; पण त्यांची सर्जनशीलता कधी थांबली नाही. अभंग, भक्तिगीते, भावगीते आणि गझल अशा विविध प्रकारच्या रचना त्या सातत्याने करत राहिल्या. त्यांच्या वहीत जपलेले हे स्वर, शिष्यांच्या कंठातून पुढे जात राहिले; मात्र घराच्या आणि शिष्यपरिवाराच्या पलीकडे ते फारसे पोहोचले नाहीत.

‘विठ्ठलाचे भेटी’ ही त्या रचनांपैकी प्रथमच अधिकृतपणे रसिकांसमोर येणारी रचना आहे.

गायिका प्रियांका बर्वे हिच्यासाठी हा केवळ एका जुन्या रचनेचा पुनर्जन्म नाही. हा तिला घरातून मिळालेल्या संगीतसंस्कारांचा पुढचा टप्पा आहे. पहाटेचा रियाज, शब्दांचा आदर, प्रत्येक स्वराला वेळ देण्याची शिस्त आणि संगीताकडे साधना म्हणून पाहण्याची दृष्टी… हे सारे तिने रंगमंचावर उभे राहण्याआधीच नकळत आत्मसात केले होते.

याच वातावरणात वाढलेली प्रियांका पुढे मराठी चित्रपटसृष्टीतील महत्त्वाच्या पार्श्वगायिकांपैकी एक बनली. ‘बंधिशाळा’ चित्रपटातील ‘काळोखाच्या वाटेवरती’ या गीतासाठी तिला महाराष्ट्र राज्य पुरस्कार मिळाला. रमा माधव, आनंदी गोपाळ, चंद्रमुखी, मी वसंतराव आणि पानिपत यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये आणि टीवी मालिकांमध्ये त्यांनी आपल्या आवाजाची वेगळी ओळख निर्माण केली. रंगभूमीवर ‘मुघल-ए-आझम : द म्युझिकल’ मधील अनारकलीच्या भूमिकेने तिला देशभरातील रसिकांपर्यंत पोहोचवले. पण ‘विठाई’ तिला पुन्हा त्या घरात घेऊन जाते, जिथे तिच्या संगीतप्रवासाची पहिली सुरुवात झाली.

‘विठाई’ हा प्रकल्प प्रियांका बर्वे आणि तिचे पती, निर्माता व संगीत संयोजक सारंग कुलकर्णी यांनी ‘द प्रियारंग प्रोजेक्ट’ अंतर्गत साकारला आहे. या रचनांवर काम करताना त्यांच्यासमोर एकच प्रश्न होता… जुन्या रचनेचा आत्मा जपत तिला आजच्या पिढीपर्यंत कसं पोहोचवायचं?

त्याचं उत्तर ‘विठ्ठलाचे भेटी’ मध्ये ऐकू येतं.

या गीताला कवी सुधांशू यांचे शब्द लाभले असून, ही विदुषी मालती पांडे बर्वे यांची मूळ रचना आहे. सारंग कुलकर्णी यांनी या गीताची संकल्पना मांडत संगीत संयोजन केलं आहे. मूळ चालीवर कोणताही अनावश्यक आविष्कार न करता तिच्या भावविश्वाला केंद्रस्थानी ठेवण्या…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button