हडपसर–मांजरी परिसरातील विकासकामे, अतिक्रमण व वाहतूक समस्यांची प्रत्यक्ष पाहणी; मेट्रोपूर्व नियोजनावर भर

पुणे, दि. २१ जुलै : प्रभाग क्रमांक १७ हडपसर–मांजरी परिसरातील अतिक्रमण, वाहतूक कोंडी आणि विविध नागरी समस्यांचा आढावा घेण्यासाठी आज संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष स्थळ पाहणी करण्यात आली. परिसरात लवकरच मेट्रो प्रकल्पाची कामे सुरू होणार असल्याने भविष्यात उद्भवणाऱ्या अडचणी टाळण्यासाठी नियोजन करण्यावर यावेळी विशेष भर देण्यात आला.

स्थानिक नागरिक आणि लोकप्रतिनिधींकडून अतिक्रमण, वाहतूक कोंडी तसेच विकासकामांबाबत सातत्याने तक्रारी आणि सूचना प्राप्त होत असल्याच्या पार्श्वभूमीवर ही संयुक्त पाहणी आयोजित करण्यात आली. पाहणीदरम्यान संबंधित विभागांना आवश्यक उपाययोजना तातडीने राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या.

या पाहणीत स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले, अतिरिक्त आयुक्त (वि.) ओमप्रकाश दिवटे, महामेट्रोचे वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक आशुतोष झा, हडपसर–मांजरी क्षेत्रीय कार्यालयाचे प्रभाग अध्यक्ष प्रशांत तुपे, डॉ. दादा कोद्रे, अजित घुले, सरिता घुले, पायल तुपे, नंदाताई अबनावे, मारुती तुपे यांच्यासह महापालिकेचे विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पाहणीदरम्यान रस्त्यांची स्थिती, वाहतूक व्यवस्थापन, अतिक्रमण, पायाभूत सुविधा तसेच प्रस्तावित विकासकामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. नागरिकांना अधिक चांगल्या नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक कार्यवाही प्राधान्याने करण्यात येणार असून, मेट्रो प्रकल्पाच्या कामादरम्यान नागरिकांना कमीत कमी त्रास होईल यासाठी सर्व संबंधित विभागांमध्ये समन्वय साधून नियोजनबद्ध उपाययोजना केल्या जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button