
पुणे : खासदार पार्थ अजित पवार यांच्या नियोजित वधूबाबत काही वृत्तवाहिन्या, डिजिटल माध्यमे आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रसारित झालेल्या चुकीच्या माहितीनंतर अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आले आहे. समाजामध्ये कोणताही संभ्रम राहू नये आणि अचूक माहिती जनतेपर्यंत पोहोचावी, या उद्देशाने अधिकृत प्रेसनोट प्रसिद्ध करण्यात आली आहे.
प्रेसनोटनुसार, खासदार पार्थ पवार यांच्या नियोजित वधूचे अधिकृत नाव कायनात दारा (Kaiynaat Dara) असून, त्यांच्या नावाचा चुकीचा उच्चार, चुकीचे स्पेलिंग तसेच कौटुंबिक आणि सामाजिक पार्श्वभूमीबाबत काही माध्यमांमध्ये चुकीची माहिती प्रसिद्ध झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.
प्रसिद्ध करण्यात आलेल्या माहितीनुसार, कायनात दारा या पंजाबी हिंदू, क्षत्रिय समाजातील असून त्यांचे गोत्र कश्यप आहे. काही माध्यमांमध्ये त्यांचा “काश्मिरी” असा उल्लेख करण्यात आला होता, मात्र तो वस्तुस्थितीशी सुसंगत नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
शैक्षणिक पार्श्वभूमीबाबत सांगायचे झाल्यास, त्यांनी नवी दिल्लीतील द ब्रिटिश स्कूल, चाणक्यपुरी येथून शालेय शिक्षण पूर्ण केले आहे. त्यानंतर त्यांनी लंडनमधील प्रतिष्ठित लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स (LSE) येथून इंटरनॅशनल रिलेशन्स विषयात बी.एस्सी. (फर्स्ट क्लास ऑनर्स) पदवी संपादन केली आहे.
व्यावसायिक कारकिर्दीत त्यांनी भारतातील अग्रगण्य इंग्रजी वृत्तवाहिनी NDTV 24×7 मध्ये आउटपुट एडिटर आणि रिपोर्टर म्हणून काम केले आहे. सध्या त्या आपल्या कुटुंबाच्या हॉस्पिटॅलिटी आणि रिअल इस्टेट व्यवसायाशी संबंधित कार्य पाहत आहेत.
प्रेसनोटमध्ये नमूद करण्यात आले आहे की, शिक्षण, जागतिक दृष्टिकोन, व्यावसायिक अनुभव, सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव आणि भारतीय सांस्कृतिक मूल्यांचा आदर या गुणांमुळे त्या सार्वजनिक जीवनात सकारात्मक योगदान देतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
यासोबतच माध्यमांना आवाहन करण्यात आले आहे की, भविष्यात खासदार पार्थ पवार आणि त्यांच्या नियोजित वधूबाबत वृत्त प्रसिद्ध करताना अधिकृत माहितीचा आधार घ्यावा आणि कोणतीही अप्रमाणित अथवा चुकीची माहिती प्रसारित करू नये, जेणेकरून समाजात संभ्रम निर्माण होणार नाही.