
पुणे, दि. २६ जुलै २०२६ : पर्यावरण संवर्धनाचा प्रभावी संदेश देणाऱ्या ‘वसुंधरा’ या शैक्षणिक लघुपटाचे विशेष सादरीकरण पुण्यातील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय (National Film Archive of India) येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. साई मीडिया एंटरटेनमेंट प्रस्तुत या लघुपटाची निर्मिती संपत मेमाणे आणि मंदार नामजोशी यांनी केली असून, भक्ती जाधव यांनी लेखन आणि योगेश जाधव यांनी दिग्दर्शन केले आहे.
या विशेष कार्यक्रमाला शिक्षण क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. श्री. नंदकुमार सागर (सचिव, महाराष्ट्र), श्री. शिवाजी कामठे (सचिव, पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघ), श्री. हनुमंत पवार (वरिष्ठ सहसंपादक, वार्ता) तसेच श्री. आशिष जराड (जिल्हा परिषद) यांनी उपस्थित राहून लघुपटाचे कौतुक केले. उपस्थित मान्यवरांचे स्वागत आणि सत्कार निर्माते संपत मेमाणे यांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते मकरंद अनासपुरे यांची उपस्थिती. ‘वसुंधरा’मध्ये त्यांनी ‘काकाजी’ ही महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. यावेळी त्यांनी विद्यार्थी, शिक्षक आणि उपस्थित प्रेक्षकांशी संवाद साधत पर्यावरण संवर्धनाची गरज अधोरेखित केली. पर्यावरणाचे रक्षण ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी असून, अशा शैक्षणिक चित्रपटांमधून विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक बदल घडवता येऊ शकतो, असे त्यांनी सांगितले.
‘वसुंधरा’ हा लघुपट विद्यार्थ्यांना मनोरंजनाच्या माध्यमातून पर्यावरणाबाबत जागरूक करणारा आहे. वृक्षारोपण, पर्यावरण संवर्धन, ग्लोबल वॉर्मिंग, पाण्याचा योग्य वापर, विजेची बचत, प्रदूषण नियंत्रण आणि निसर्ग संरक्षण यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर अत्यंत सोप्या आणि प्रभावी पद्धतीने भाष्य करण्यात आले आहे. हा लघुपट राज्यातील विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी प्रदर्शित करण्यात येणार असून पर्यावरण शिक्षणासाठी तो उपयुक्त शैक्षणिक माध्यम ठरणार आहे.
निर्माते मंदार नामजोशी यांनी यापुढील काळातही सामाजिक, शैक्षणिक आणि माहितीपर विषयांवर असेच दर्जेदार लघुपट तयार करण्याचा मानस व्यक्त केला.
यावेळी चित्रपटातील कलाकार मंदार नामजोशी, आनंद जोशी, श्रद्धा साटम तसेच चित्रपटाशी संबंधित तंत्रज्ञ उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी लघुपटाच्या संकल्पनेचे कौतुक करत विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या शेवटी गायकवाड सर यांनी उपस्थित मान्यवर, शिक्षक, कलाकार, तंत्रज्ञ आणि प्रेक्षकांचे आभार मानले. उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडलेल्या या कार्यक्रमाची सांगता आनंददायी वातावरणात झाली.