
पुणे, 17 जुलै : हवेली क्रमांक 20 येथील दुय्यम निबंधक कार्यालयात स्टॅम्प ड्युटीच्या माध्यमातून शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडविल्याचा गंभीर आरोप भाजप हवेली तालुका (कायदा आघाडी) उपाध्यक्ष गणेश गोरख घाडगे यांनी केला आहे. या संदर्भात मुख्यमंत्री, महसूल मंत्री, नोंदणी महानिरीक्षक (IGR) आणि सह जिल्हा निबंधक (JDR) यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
घाडगे यांनी प्रसिद्धीपत्रकात दावा केला आहे की, हवेली क्र. 20 कार्यालयातील कनिष्ठ लिपिक तथा सह दुय्यम निबंधक रवींद्र नामदेव कोळी यांनी पदाचा गैरवापर करून बनावट 7/12 उतारे, चुकीचे झोन दाखवणे, कमी मूल्यांकनावर दस्त नोंदणी करणे आणि स्टॅम्प ड्युटी कमी आकारण्याचे प्रकार केल्यामुळे शासनाला मोठा महसूल तोटा झाला आहे.
तक्रारीनुसार, निवासी क्षेत्राला ‘बायोडायव्हर्सिटी पार्क’ दाखवणे, ऑनलाइन पीकपाणी पडताळणी न करणे, दस्तांचे योग्य मूल्यांकन वरिष्ठांकडे न पाठवणे तसेच दस्त नोंदणी प्रक्रियेत जाणीवपूर्वक विलंब करून गैरव्यवहार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तक्रारीतील प्रमुख आरोप
तक्रारीत काही दस्त क्रमांकांचा उल्लेख करत कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तांची कमी मूल्यांकनावर नोंदणी झाल्याचा दावा करण्यात आला आहे. यामध्ये चऱ्होली बुद्रुक, पाषाण, कोथरूड आणि इतर भागातील दस्त नोंदणींचा समावेश असून, शासनाचा मोठा महसूल बुडाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
प्रमुख मागण्या
- संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ पदावरून हटवून निलंबित करण्यात यावे.
- JDR कार्यालयामार्फत विशेष चौकशी पथक नेमून सर्व संशयित दस्तांची तपासणी करावी.
- महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम, नोंदणी अधिनियम, भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा आणि भारतीय न्याय संहितेअंतर्गत (BNS) फौजदारी गुन्हे दाखल करावेत.
- प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी.