मुंबई, दि. ३१ : महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात आज एक ऐतिहासिक क्षण नोंदवला गेला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार यांनी आज महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, त्यामुळे त्या या पदावर विराजमान होणाऱ्या राज्यातील पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या आहेत.मुंबईतील राजभवनात सायंकाळी ५ वाजता आयोजित करण्यात आलेल्या शपथविधी सोहळ्यात राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी त्यांना पदाची शपथ दिली. या सोहळ्याला मुख्यमंत्री, मंत्रिमंडळातील सहकारी, राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते तसेच विविध पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.सुनेत्रा पवार यांच्या नियुक्तीची पार्श्वभूमी अत्यंत भावनिक आणि राजकीय दृष्टिकोनातून महत्त्वाची आहे. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे झालेल्या विमान अपघातात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झाल्यानंतर हे पद रिक्त झाले होते. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाची बैठक घेण्यात आली असून, या बैठकीत सुनेत्रा पवार यांची गटनेतेपदी एकमताने निवड करण्यात आली.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनेत्रा पवार यांच्याकडे राज्य उत्पादन शुल्क (Excise) आणि क्रीडा (Sports) ही खाती सोपवली जाण्याची शक्यता आहे. सध्या त्या राज्यसभेच्या खासदार असून, घटनात्मक तरतुदीनुसार त्यांना पुढील सहा महिन्यांत विधानसभेची किंवा विधान परिषदेची सदस्यता घ्यावी लागणार आहे.सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीमुळे राज्याच्या राजकारणात नवा अध्याय सुरू झाला असून, महिला नेतृत्वाला मिळालेल्या या ऐतिहासिक संधीचे राज्यभरातून स्वागत होत आहे.