कळस येथे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या भव्य शिल्पासह स्वागत कमान उभारणार; स्थायी समितीची मंजुरी

पुणे : पुणे शहराच्या सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि आध्यात्मिक वैभवात भर घालणाऱ्या महत्त्वपूर्ण उपक्रमाला पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. आळंदी रोडमार्गे पुणे शहरात प्रवेश करताना कळस परिसरात, महापालिकेच्या हद्दीच्या प्रारंभस्थळी महाराष्ट्राचे आराध्य दैवत संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पूर्णाकृती शिल्पासह भव्य स्वागत कमान उभारण्यात येणार आहे.

आळंदी रोड हा पुणे शहरातील प्रमुख प्रवेशमार्गांपैकी एक असून दररोज हजारो नागरिक, वारकरी, भाविक, पर्यटक तसेच देश-विदेशातील पाहुणे या मार्गाचा वापर करतात. संत ज्ञानेश्वर महाराजांचे संजीवन समाधीस्थळ असलेल्या आळंदीशी या मार्गाचा जवळचा संबंध असल्याने शहराच्या प्रवेशद्वारावर त्यांच्या स्मृतीस अभिवादन करणारी स्वागत कमान उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या स्वागत कमानीमुळे पुण्याची संतपरंपरा, वारकरी संस्कृती आणि महाराष्ट्राची आध्यात्मिक ओळख अधिक प्रभावीपणे अधोरेखित होणार आहे. तसेच शहरात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक नागरिक आणि पर्यटकाचे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या प्रेरणादायी विचारांच्या साक्षीने स्वागत होणार आहे.

स्थायी समितीचे सदस्य आणि माजी नगरसेवक सुहास विजय टिंगरे यांनी या प्रस्तावासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व सदस्यांचे आभार मानले. हा उपक्रम पुण्याच्या सांस्कृतिक वारशाचे जतन करणारा आणि शहराच्या ओळखीत भर घालणारा ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या प्रकल्पामुळे आळंदी रोड परिसराला एक नवे आकर्षण मिळणार असून, पुणे शहराच्या सांस्कृतिक अभिमानाचे प्रतीक म्हणून ही स्वागत कमान भविष्यात ओळखली जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button