
पुणे, दि. 31 जुलै : पुणे शहरातील अग्निसुरक्षा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने पुणे महानगरपालिकेच्या महासभेत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. नगरसेवक तथा स्थायी समिती सदस्य सुहास विजय टिंगरे यांनी मांडलेला शहरातील दाट लोकवस्ती, झोपडपट्ट्या, बाजारपेठा आणि गर्दीच्या भागांमध्ये आधुनिक फायर हायड्रंट प्रणाली उभारणे तसेच विद्यमान फायर हायड्रंट कार्यान्वित करण्याचा ठराव महासभेत एकमताने मंजूर करण्यात आला.
पुणे शहराचा वाढता विस्तार, वाढती लोकसंख्या, अरुंद रस्ते, जुन्या पेठा आणि दाट लोकवस्तीच्या भागांमध्ये आग लागण्याच्या घटनांमध्ये अग्निशमन दलाला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अनेक ठिकाणी तातडीने पाण्याचा पुरवठा उपलब्ध होत नसल्याने आग नियंत्रणात आणण्यास विलंब होतो. ही बाब लक्षात घेऊन शहरभर सक्षम आणि आधुनिक फायर हायड्रंट नेटवर्क उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मंजूर ठरावानुसार शहरातील सर्व विद्यमान फायर हायड्रंटचे सर्वेक्षण करून त्यांची कार्यस्थिती तपासण्यात येणार आहे. बंद अवस्थेतील हायड्रंट तातडीने दुरुस्त करून कार्यान्वित करण्यात येतील. तसेच झोपडपट्ट्या, दाट लोकवस्ती, बाजारपेठा, औद्योगिक क्षेत्रे आणि इतर उच्च जोखमीच्या भागांमध्ये नवीन फायर हायड्रंट उभारण्याची कार्यवाही केली जाणार आहे.
याशिवाय सर्व फायर हायड्रंटचे GIS आधारित डिजिटल मॅपिंग, नियमित तपासणी, देखभाल आणि सुरक्षा लेखापरीक्षण, पाणीपुरवठा विभाग व अग्निशमन विभाग यांच्यात प्रभावी समन्वय तसेच नागरिकांमध्ये अग्निसुरक्षेबाबत जनजागृती आणि प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यावरही भर दिला जाणार आहे.
याबाबत बोलताना नगरसेवक सुहास विजय टिंगरे म्हणाले, “नागरिकांची सुरक्षितता ही पुणे महानगरपालिकेची सर्वोच्च जबाबदारी आहे. आग लागल्यानंतर धावपळ करण्यापेक्षा आग विझविण्याची सक्षम यंत्रणा आधीपासून उपलब्ध असणे अत्यंत आवश्यक आहे. महासभेने या महत्त्वपूर्ण ठरावाला मंजुरी दिल्याबद्दल सर्व सदस्यांचे आभार. आता प्रशासनाने या निर्णयाची तातडीने प्रभावी अंमलबजावणी करून पुणे शहर अधिक सुरक्षित करण्यासाठी आवश्यक पावले उचलावीत.”
या निर्णयामुळे पुणे शहरातील अग्निसुरक्षा व्यवस्थेला मोठी बळकटी मिळणार असून, आपत्कालीन परिस्थितीत अग्निशमन दलाचा प्रतिसाद अधिक जलद आणि प्रभावी होण्यास मदत होणार आहे. तसेच नागरिकांच्या जीवित आणि मालमत्तेचे संरक्षण अधिक सक्षमपणे करता येणार असल्याने हा निर्णय शहराच्या सुरक्षिततेसाठी दूरदृष्टीचा आणि महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे.