राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाला ब्रेक : १२ फेब्रुवारीची तारीख ठरलेली होती, अजित पवार आग्रही होते – शरद पवार यांचा मोठा खुलासा

पुणे दि. 31 : राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाबाबत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) प्रमुख शरद पवार यांनी महत्त्वाचे आणि खळबळजनक खुलासे केले आहेत. त्यांनी स्पष्ट केले की, दोन्ही गटांच्या विलीनीकरणाची १२ फेब्रुवारी २०२६ ही तारीख निश्चित करण्यात आली होती.

शरद पवार यांनी सांगितले की, उपमुख्यमंत्री अजित पवार हे स्वतः विलीनीकरणासाठी आग्रही होते. मागील चार महिन्यांपासून अजित पवार, जयंत पाटील आणि शशिकांत शिंदे यांच्यात सकारात्मक चर्चा सुरू होती. पक्षातील फूट मिटवून एकत्र येण्याच्या दिशेने हालचाली वेग घेत असल्याचे त्यांनी नमूद केले.

मात्र, २८ जानेवारी २०२६ रोजी झालेल्या दुर्दैवी विमान अपघातात अजित पवार यांचे निधन झाल्यामुळे या संपूर्ण प्रक्रियेला अचानक खंड पडला. या घटनेनंतर विलीनीकरणासंदर्भातील चर्चा सध्या थांबवण्यात आल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले.

या अपघातामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या भविष्यातील राजकीय वाटचालीसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा निर्णय सध्या स्थगित झाला आहे. पुढील काळात परिस्थितीचा आढावा घेऊनच कोणताही निर्णय घेतला जाईल, असे संकेतही शरद पवार यांनी दिले.

दरम्यान, अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्याची शक्यता वर्तवली जात असून, यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाठिंबा दर्शवल्याची माहितीही समोर आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button