‘केस नं. ७३’मध्ये शैलेश दातारांचा निडर पोलीस अवतार; ६ फेब्रुवारीला चित्रपट प्रदर्शित

पुणे दि. 30 : विविध माध्यमांतून वैविध्यपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणारे अभिनेते शैलेश दातार आता नव्या दमदार भूमिकेत झळकणार आहेत. येत्या ६ फेब्रुवारीला प्रदर्शित होणाऱ्या ‘केस नं. ७३’ या मराठी चित्रपटात ते एसपी संजय देशमुख या जिगरबाज आणि कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहेत.एसपी संजय देशमुख यांनी आपल्या संपूर्ण सेवाकाळात प्रामाणिकपणे कर्तव्य बजावत एकही गुन्हा अनसॉल्व्ह राहू दिलेला नाही. प्रामाणिकपणा, कर्तृत्व आणि सरळ स्वभावामुळे ते गावात लोकप्रिय अधिकारी म्हणून ओळखले जातात. मात्र, निवृत्तीच्या उंबरठ्यावर असताना त्यांच्याकडे एक अत्यंत गुंतागुंतीची केस येते. या केसचा छडा लावण्याचे प्रचंड दडपण त्यांच्यावर येते. धागेदोरे सापडत नसताना प्रत्येक क्षण त्यांच्यासाठी कसोटीचा ठरतो. धाडस, शिस्त आणि प्रामाणिकपणाचा प्रत्यय देणारी ही भूमिका कथानकाला वेगळी कलाटणी देणार आहे.लायलॅक मोशन पिक्चर्स आणि डस्क स्टुडिओज निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन डॉ. मिलिंद मुक्तेश्वर आपटे यांनी केले आहे. चित्रपटाची निर्मिती शर्वरी सतीश वटक आणि डॉ. मिलिंद मुक्तेश्वर आपटे यांनी केली असून सहनिर्माते प्रविण अरुण खंगार आहेत.या भूमिकेबद्दल बोलताना शैलेश दातार म्हणाले की, जिगरबाज पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारणे हे त्यांच्यासाठी मोठे आव्हान होते. एकामागोमाग होणाऱ्या खुनांच्या मालिकेचा आणि त्यामागील गुन्हेगाराचा शोध घेताना निर्माण होणारे गूढ ‘केस नं. ७३’ मध्ये पाहायला मिळणार आहे. या चित्रपटातील सस्पेन्स प्रेक्षकांना खिळवून ठेवेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.या चित्रपटात शैलेश दातार यांच्यासोबत अशोक शिंदे, राजसी भावे, नंदिता पाटकर आणि पियुष आपटे यांची तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button