उंड्री महादेववाडीमध्ये पिण्याच्या पाण्यात अळ्या; दोन दिवसांत उपाय न झाल्यास आंदोलनाचा इशारा

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ४१ अंतर्गत येणाऱ्या उंड्री येथील महादेववाडी परिसरात पिण्याच्या पाण्यात अळ्या आढळल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. घुले नगर, खालची आळी व मधली आळी या भागांतील नागरिकांना पुरवठा होणारे पाणी दूषित असल्याने नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यामुळे परिसरात चिंता आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.याशिवाय सर्व्हे नंबर १२ परिसरात ड्रेनेज लाईनमधील सांडपाणी काही घरांमध्ये शिरत असल्याच्या तक्रारीही समोर आल्या आहेत. या परिस्थितीमुळे विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना संसर्गजन्य आजारांचा धोका निर्माण झाला आहे. संबंधित विभागाकडून वेळेत देखभाल आणि दुरुस्ती न झाल्यामुळे ही परिस्थिती उद्भवल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.या पार्श्वभूमीवर शिवसेना पुणे शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्या नेतृत्वाखाली पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम यांना निवेदन देण्यात आले आहे. यामध्ये महादेववाडी परिसरात तातडीने स्वच्छ व निर्जंतुक पिण्याच्या पाण्याचा पर्यायी पुरवठा सुरू करणे, पाणीपुरवठा वाहिन्यांची तांत्रिक तपासणी करून आवश्यक दुरुस्ती करणे तसेच ड्रेनेज व्यवस्थेतील बिघाडावर कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत.पिण्याचे स्वच्छ पाणी हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार असून सुरक्षित पेयजल उपलब्धता हा मानवी हक्क असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, पुढील दोन दिवसांत ठोस कारवाई न झाल्यास पुणे महानगरपालिका आयुक्त कार्यालयात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button