पुणे दि. 30 : महाराष्ट्राच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावणारे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहरात भव्य स्मारक उभारण्याची मागणी जोर धरत आहे. भारतीय जनता पक्षाचे आमदार महेश लांडगे यांनी यासंदर्भात महापालिका प्रशासनाला अधिकृत पत्र देत नवीन प्रशासकीय इमारतीच्या परिसरात स्मारक उभारण्याचा प्रस्ताव मांडला आहे.उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे विमान अपघातात निधन झाले होते, ज्यामुळे राज्यभर शोककळा पसरली होती.महेश लांडगे यांनी पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकर यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन दिले. चिंचवड येथील डी-मार्टसमोर उभारण्यात येत असलेल्या सुमारे ३३.८६ एकर क्षेत्रफळाच्या नवीन प्रशासकीय संकुलात हे स्मारक उभारण्याची संकल्पना मांडण्यात आली आहे. या संकुलाच्या मुख्य इमारतीसाठी ८.६५ एकर जागा वापरली जात असून, त्याच परिसरात अजित पवार यांचा पूर्णाकृती ब्राँझ पुतळा उभारण्याचा प्रस्ताव आहे.लांडगे यांनी या स्मारकाला “अजित सृष्टी” असे नाव देण्याची संकल्पना मांडली असून, भविष्यातील पिढ्यांना त्यांच्या प्रशासकीय कार्याची प्रेरणा मिळावी हा उद्देश असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच नवीन प्रशासकीय इमारतीतील सभागृहाला “अजितदादा पवार ऑडिटोरियम” असे नाव देण्याचीही सूचना करण्यात आली आहे.अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री म्हणून काम करताना राज्यातील पायाभूत सुविधा, नागरी प्रशासन आणि विकासाभिमुख धोरणांना गती दिली होती. त्यांच्या नेतृत्वामुळे पिंपरी-चिंचवडसारख्या शहरांच्या विकासाला चालना मिळाली, असे लांडगे यांनी नमूद केले आहे.नवनिर्वाचित नगरसेवकांची पहिली सर्वसाधारण सभा झाल्यानंतर या स्मारकाचा प्रस्ताव मंजूर करण्याची मागणी करण्यात आली आहे. तोपर्यंत जुन्या सभागृहात अजित पवार यांचे तैलचित्र लावण्याचीही सूचना देण्यात आली आहे.