
पुणे दि. 30 : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळाच्या पुढाकाराने ‘जय गणेश रुग्णसेवा अभियान’ अंतर्गत महाराष्ट्रातील १७७१ दिव्यांगांना कृत्रिम अवयव देण्याचा महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहे. थोरले बाजीराव पेशवे रस्त्यावरील ट्रस्टच्या आरोग्य सेवा केंद्र, हिराबाग कोठी येथे हे शिबीर आठवडाभर सुरू राहणार आहे. हा उपक्रम सलग चौथ्या वर्षी आयोजित करण्यात आला आहे.
टाटा ऑटोकॉम सिस्टिम्स, पिनॅकल इंडस्ट्रीज आणि श्री भगवान महावीर विकलांग सहाय्यता समिती (जयपूर फूट), इंदौर यांच्या सहकार्याने हे शिबीर आयोजित करण्यात आले आहे. उद्घाटन प्रसंगी टाटा ऑटोकॉम सिस्टिम्सचे व्हाईस चेअरमन डॉ. अरविंद गोयल, सुमती गोयल, पिनॅकल इंडस्ट्रीजचे चेअरमन डॉ. सुधीर मेहता, ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सहचिटणीस अमोल केदारी, उत्सव प्रमुख अक्षय गोडसे, तसेच सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण आणि पदाधिकारी उपस्थित होते.
डॉ. सुधीर मेहता यांनी सांगितले की, विविध संस्था एकत्र आल्यास मोठ्या प्रमाणात समाजसेवा करता येते. कृत्रिम अवयव मिळाल्यानंतर दिव्यांगांनी आत्मविश्वासाने काम करून स्वावलंबी व्हावे, असे त्यांनी आवाहन केले. तसेच भविष्यात पुण्यासोबत नागपूर व विदर्भातही असे शिबीर आयोजित करण्याचा मानस असल्याचे डॉ. अरविंद गोयल यांनी सांगितले.
प्रास्ताविकात महेश सूर्यवंशी यांनी सांगितले की, पुण्यासह लातूर, परभणी, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, अहिल्यानगर, धाराशिव तसेच गोवा येथूनही दिव्यांग या शिबिरासाठी आले आहेत. ट्रस्टच्या पुढाकारातून आतापर्यंत सुमारे ७ हजार दिव्यांगांना कृत्रिम अवयव देण्यात आले आहेत. या शिबिरात व्हीलचेअर, कुबड्या, काठ्या, कॅलिपर आणि जयपूर फूट देण्यात येत असून पोलिओग्रस्त बालकांसाठी विशेष व्हीलचेअर देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे.