रोहिणी हट्टंगडी – मुक्ता बर्वे पुन्हा एकत्र; ‘माया’मधून मोठ्या पडद्यावर स्त्रीमनाचा प्रगल्भ प्रवास

मुंबई दि. 30 : मराठी रंगभूमीवर ‘चारचौघी’ या गाजलेल्या नाटकातून माय–लेकीचं नातं प्रभावीपणे साकारल्यानंतर रोहिणी हट्टंगडी आणि मुक्ता बर्वे ही दमदार जोडी आता मोठ्या पडद्यावर एकत्र येत आहे. या दोघी आगामी मराठी चित्रपट ‘माया’ मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

शालिनी सिनेमाज आणि नितीन वैद्य प्रॉडक्शन निर्मित या चित्रपटाचे निर्माते डॉ. सुनील दातार, अलका मधुकर दातार आणि नितीन प्रकाश वैद्य आहेत. आदित्य इंगळे दिग्दर्शित या चित्रपटात मुक्ता बर्वे, रोहिणी हट्टंगडी यांच्यासोबत गिरीश ओक, सिद्धार्थ चांदेकर आणि विजय केंकरे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

हा चित्रपट २७ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रदर्शित होणार असून पोस्टर आणि टीझरमुळे आधीच चर्चेत आहे.

‘माया’ ही कथा नातेसंबंध, भावनिक गुंतागुंत आणि स्त्रीच्या आत्मशोधाचा प्रवास मांडणारी ड्रामा शैलीतील आहे. चित्रपटातील मध्यवर्ती व्यक्तिरेखा आयुष्यातील भूतकाळ, नात्यांतील ताण आणि भावनिक संघर्षांचा सामना करत स्वतःला नव्याने शोधते, अशी कथा असल्याचे समोर आले आहे.

रोहिणी हट्टंगडी यांचा सूक्ष्म आणि प्रभावी अभिनय आणि मुक्ता बर्वे यांचं आधुनिक, सशक्त स्त्री व्यक्तिमत्त्व यांचा संगम ‘माया’मध्ये पाहायला मिळणार असल्याने प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. स्त्रीमनाच्या विविध छटा आणि नात्यांमधील भावनिक स्तर यांचा प्रगल्भ आविष्कार या चित्रपटातून अनुभवायला मिळेल, अशी चर्चा सध्या रंगली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button