
मुंबई, दि. 29 : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे महाराष्ट्रावर शोककळा पसरली असून विविध स्तरांतून शोक व्यक्त केला जात आहे. कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत त्यांना “जनतेशी थेट संवाद साधून विकासाभिमुख धोरणांना दिशा देणारा कुटुंबप्रमुख” असे संबोधले.
भरणे म्हणाले की, अजित पवार यांचे निधन ही केवळ राजकीय क्षेत्रातील नव्हे तर वैयक्तिक आयुष्यातीलही मोठी हानी आहे. “अजितदादा आमच्यासाठी नेता नव्हते, तर आधारस्तंभ होते. कठीण प्रसंगी पाठीशी उभे राहणारे कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तिमत्व होते,” असे त्यांनी सांगितले.
गेल्या चार दशकांत अजित पवार यांनी लाखो कार्यकर्त्यांना घडवले. विकास आणि सर्वसामान्य नागरिक हेच त्यांचे ध्येय होते. पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत काम करण्याची त्यांची कार्यपद्धती कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी होती.
दरम्यान, २८ जानेवारी २०२६ रोजी मुंबईहून बारामतीकडे जात असताना लिअरजेट विमानाच्या लँडिंगदरम्यान झालेल्या अपघातात अजित पवार यांचे निधन झाले. या अपघातात विमानातील सर्व पाच जणांचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला असून राज्यभरातून शोक व्यक्त होत आहे.
भरणे यांनी सांगितले की, अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवड, बारामतीसारख्या भागांच्या विकासात मोठे योगदान दिले. सहा वेळा उपमुख्यमंत्री पद भूषवणे आणि राज्याचा अर्थसंकल्प अनेक वेळा मांडणे हा त्यांच्या कारकिर्दीतील मोठा विक्रम आहे.
“अजितदादांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणार नाही. महाराष्ट्राने एक कर्तव्यदक्ष, रोखठोक आणि विकासाभिमुख लोकनेता गमावला आहे,” असे भरणे यांनी नमूद केले.