बारामती, दि.28 : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा ज्येष्ठ राजकीय नेते अजितदादा पवार यांच्या पार्थिवावर उद्या सकाळी ११ वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. हे अंत्यसंस्कार बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात होणार आहेत.अजितदादांच्या आकस्मिक निधनामुळे राज्यासह देशभरात शोककळा पसरली असून, सर्वसामान्य नागरिकांपासून ते राजकीय नेत्यांपर्यंत सर्व स्तरातून श्रद्धांजली अर्पण केली जात आहे. उद्याच्या अंत्यसंस्कार सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे स्वतः उपस्थित राहणार असल्याची माहिती अधिकृत सूत्रांकडून देण्यात आली आहे.राज्य सरकारकडून अंत्यसंस्कारासाठी संपूर्ण शासकीय इतमामाची तयारी करण्यात आली असून, कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने बारामती शहरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अजितदादांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी सकाळपासून खुले ठेवण्यात येणार आहे.अजितदादा पवार यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली असून, त्यांच्या कार्याची आणि नेतृत्वाची आठवण कायम स्मरणात राहील, अशी भावना सर्वत्र व्यक्त केली जात आहे.