
पुणे दि. 28 : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांचे २८ जानेवारी २०२६ रोजी पुणे जिल्ह्यातील बारामती येथे झालेल्या भीषण विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. लँडिंग दरम्यान हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती असून या दुर्घटनेत अजित पवारांसह विमानातील सर्व पाच जणांचा मृत्यू झाला आहे.
या घटनेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या अपघाताची सखोल व उच्चस्तरीय चौकशी करण्याची घोषणा केली आहे. भविष्यात अशा प्रकारच्या दुर्घटना टाळण्यासाठी या अपघातामागील सर्व कारणांचा बारकाईने तपास केला जाईल, असे शिंदे यांनी स्पष्ट केले.
अपघाताची चौकशी डीजीसीए (DGCA) आणि एअरक्राफ्ट ॲक्सीडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (AAIB) यांच्या माध्यमातून सुरू करण्यात आली असून प्राथमिक तपास प्रक्रिया सुरू आहे. अपघातग्रस्त विमान Learjet 45 प्रकारचे असल्याची माहिती समोर आली आहे.
अजित पवार यांच्या निधनावर तीव्र शोक व्यक्त करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले,
“मी माझा मोठा भाऊ गमावला आहे.”
राज्याच्या प्रशासनात अजित पवार यांनी दिलेले योगदान, त्यांचे नेतृत्वगुण आणि विकासात्मक दृष्टिकोन यांचे त्यांनी विशेष कौतुक केले.
या दुर्घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली असून राज्य सरकारने तीन दिवसांचा राज्यव्यापी दुखवटा जाहीर केला आहे. विविध राजकीय पक्षांचे नेते, सामाजिक संस्था आणि नागरिकांकडून अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.