
पुणे, दि. 27 : नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार शालेय अभ्यासक्रमात आवश्यक बदल करण्यात येत असून, बुद्धिमत्ता आधारित शैक्षणिक साधने, डिजिटल शिक्षण सामग्री आणि जीवनोपयोगी विषयांचा समावेश करण्यात येणार आहे. या प्रक्रियेत महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाची (बालभारती) भूमिका अत्यंत महत्त्वाची असून, बालभारतीला अधिक सक्षम बनवण्यासाठी शासनाच्यावतीने सर्वोतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी केले.
महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाच्या हिरक महोत्सवी वर्षाचा शुभारंभ बालगंधर्व रंगमंदिर, पुणे येथे आयोजित कार्यक्रमात झाला. यावेळी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावर, योजना संचालक कृष्णकुमार पाटील, बालभारतीच्या संचालक अनुराधा ओक, माध्यमिक शिक्षण सहसंचालक श्रीराम पानझडे, प्राथमिक शिक्षण सहसंचालक रमाकांत काठमोरे, सुकाणू समितीचे श्रीपाद देखणे, ‘किशोर’ मासिकाचे संपादक किरण केंद्रे आदी मान्यवर उपस्थित होते.
शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे म्हणाले की, अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्तक निर्मितीत नाविन्यपूर्ण बदल करताना शिक्षक, पालक आणि नागरिकांच्या सूचनांचा विचार करण्यात यावा. कृषी, आरोग्य, क्रीडा, अध्यात्म यांसारखे विषय विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाचे असून अभ्यासक्रम समाजाच्या गरजांशी सुसंगत असणे आवश्यक आहे. विद्यार्थी केंद्रस्थानी ठेवून गुणवत्तापूर्ण व आनंददायी शिक्षण देण्यावर शासनाचा भर आहे.
सन १९६८ पासून गेली ५९ वर्षे बालभारती दर्जेदार, संस्कारक्षम व वैशिष्ट्यपूर्ण पाठ्यपुस्तके अल्प दरात उपलब्ध करून देत आहे. छापील पुस्तकांसोबतच ई-बुक्स, डिजिटल पाठ्यपुस्तके, क्यूआर कोड, ई-कंटेंट तसेच ऑडिओ-व्हिडिओ साहित्याद्वारे बालभारतीने काळानुरूप बदल स्वीकारले आहेत.
सध्या मराठी, हिंदी, इंग्रजीसह उर्दू, कन्नड आदी १० भाषांमध्ये तसेच गणित, विज्ञान, इतिहास, भूगोल, आरोग्य व शारीरिक शिक्षण अशा एकूण १६ विषयांचे अभ्यासक्रम विकसित करण्यात येत आहेत.
प्रजासत्ताक दिनानिमित्त ‘राष्ट्र प्रथम’ उपक्रमांतर्गत राज्यभरात आयोजित सामूहिक कवायत संचलनात सुमारे एक लाख शाळांमधील दोन कोटींहून अधिक विद्यार्थी आणि सात लाख शिक्षकांनी सहभाग नोंदवला. या उपक्रमाची नोंद वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स, लंडन यांनी घेतली असून एक विश्वविक्रम प्रस्थापित झाला आहे.
यावेळी शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते ‘किशोर’ मासिकाचे प्रकाशन तसेच ‘बालभारती गीता’चे अनावरण करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांच्या शुभेच्छा संदेशांचे चित्रफितीद्वारे सादरीकरण करण्यात आले, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शुभेच्छा संदेश वाचन करून दाखविण्यात आला.