
मुंबई दि. २८ : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विमान अपघातात निधन झाल्याची बातमी समजताच मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. ही घटना मनाला अत्यंत व्यथित करणारी असून मन सुन्न झाले आहे, अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
“जमिनीशी घट्ट नाळ असलेले जननेते, माझे मित्र आणि सहकारी अजितदादा पवार यांच्या निधनाची घटना मनाला चटका लावणारी आहे. माझा दमदार आणि दिलदार मित्र मी गमावला आहे. ही माझ्यासाठी वैयक्तिक हानी असून कधीही न भरून न येणारे नुकसान आहे,” असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले.
आजचा दिवस महाराष्ट्रासाठी अतिशय कठीण असल्याचे सांगत त्यांनी अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. तसेच त्यांच्या कुटुंबीयांप्रती आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या परिवाराप्रती त्यांनी संवेदना व्यक्त केल्या.
या विमान अपघातात अन्य चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती असून, त्या सर्वांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सरकार सहभागी असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. या पार्श्वभूमीवर त्यांनी आपले सर्व नियोजित कार्यक्रम रद्द केले असून, ते थोड्याच वेळात बारामतीकडे रवाना होत असल्याचेही त्यांनी सांगितले.