
दख्खनच्या पठाराला कोकणाच्या किनाऱ्यापासून वेगळं करणारी सह्याद्री पर्वतरांग ही जणू निसर्गाने उभी केलेली अभेद्य भिंतच. पण माणूस भिंतींना भेदण्यासाठीच मार्ग शोधत आला आहे. या भिंतीला भेदून तयार झालेले घाट म्हणजे त्या जिद्दीचा साक्षीदार. त्यापैकी भोर घाट हा सर्वात महत्त्वाचा, ऐतिहासिक आणि सतत वापरात राहिलेला मार्ग. आज आपण काही तासांत पार करणारा पुणे–मुंबई प्रवास, पूर्वी दिवसांच्या प्रवासातून पूर्ण होत असे. या प्रवासाची कथा म्हणजे हजारो वर्षांच्या बदलत्या काळाची, बदलत्या तंत्रज्ञानाची आणि बदलत्या गरजांची कहाणी आहे.
सातवाहन काल : व्यापार, संस्कृती आणि घाटवाटा
सातवाहन कालात सह्याद्री ओलांडण्याची गरज प्रामुख्याने व्यापारामुळे निर्माण झाली. कोकण किनाऱ्यावरील बंदरे.. सोपारा, कल्याण, चौल ही परदेशी व्यापाऱ्यांसाठीची प्रवेशद्वार होती. रोमन साम्राज्याशीही व्यापार होत असल्याचे पुरावे आजही जुन्नर, तेर इथे सापडल्याचे पुरावे तिथल्या वस्तूसंग्रहालयात पाहायला मिळतात. या बंदरांवर उतरलेला माल दख्खनमध्ये पोहोचवण्यासाठी घाटवाटा तयार झाल्या. त्या पायवाटा होत्या… रस्ता नव्हता; पण मार्ग होता.
व्यापारी काफिले, जनावरे, आणि माणसे या घाटातून प्रवास करत असत. या प्रवासात धोके होते… वन्य प्राणी, दरोडेखोर, आणि कठीण भूप्रदेश. तरीही हा मार्ग जिवंत राहिला कारण तो गरजेचा होता. या मार्गातून केवळ वस्तूंची देवाणघेवाण झाली नाही, तर संस्कृती, भाषा, धर्म आणि विचारही एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशात पोहोचला. सह्याद्री हा अडथळा नसून, संवादाचा पूल ठरला.
मध्ययुगीन सत्ताकाळ
यादव, बहामनी आणि आदिलशाही सत्तांच्या काळात या घाटमार्गांचा वापर वाढला. सत्तेला विस्तार हवा होता, आणि त्यासाठी जलद संपर्क आवश्यक होता. घाटवाटा अधिक वापरात आल्या, काही प्रमाणात सुधारल्या गेल्या. पण या मार्गाला खऱ्या अर्थाने सामरिक धार मिळाली ती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात.
सह्याद्रीच्या किल्ल्यांच्या जाळ्यातून मराठा सत्तेने घाटांवर नियंत्रण मिळवलं. लोहगड किल्ला आणि विसापूर किल्ला हे किल्ले भोर घाटावर नजर ठेवून होते. घाटातून होणारी प्रत्येक हालचाल या किल्ल्यांच्या देखरेखीखाली होती. त्यामुळे हा मार्ग केवळ व्यापाराचा राहिला नाही; तो संरक्षण, गुप्त हालचाली आणि युद्धनीतीचा महत्त्वाचा भाग बनला.

ब्रिटिश कालखंड : पायवाट ते दगडी रस्ता
१८१८ मध्ये इंग्रजांनी महाराष्ट्रावर सत्ता प्रस्थापित केल्यानंतर त्यांच्या दृष्टीने मुंबई–पुणे संपर्क अत्यंत महत्त्वाचा ठरला. व्यापार, प्रशासन आणि लष्करी हालचालींसाठी एक सक्षम रस्ता आवश्यक होता. त्यामुळे १८३० च्या दशकात भोर घाटात दगडी रस्ता बांधण्याचे काम हाती घेण्यात आले. हा रस्ता घोडागाडी आणि बैलगाडी चालेल असा होता. पुढे घाटातील वळणं सांभाळून, उतार-चढाव नियंत्रित करत हा रस्ता उभारण्यात आला. हा टप्पा म्हणजे पुणे–मुंबई मार्गाचा आधुनिक जन्म. हजारो वर्षांच्या पायवाटांना आता एक ठोस, अभियांत्रिकी पायाभूत सुविधा मिळाली.
रेल्वेचा चमत्कार : सह्याद्रीतून लोहमार्ग
ब्रिटिशांनी पुढे एक पाऊल टाकत ‘ग्रेट इंडियन पेनीनसुला रेल्वे’ (महान भारतीय द्वीपकल्प रेल्वे) मार्फत भोर घाटातून रेल्वेमार्ग उभारला. १८६३ मध्ये हा मार्ग सुरू झाला. हे काम त्याकाळी अत्यंत कठीण होते… डोंगर फोडणे, बोगदे खोदणे, पूल बांधणे… पण यामुळे सह्याद्री ओलांडण्याची संकल्पना बदलली. प्रवास जलद, नियमित आणि सुरक्षित झाला.
स्वातंत्र्यानंतर : राष्ट्रीय महामार्ग ते द्रुतगती मार्ग
स्वातंत्र्यानंतर भारताने या मार्गाचा विकास पुढे चालू ठेवला. पुणे–मुंबई मार्ग राष्ट्रीय महामार्गात विकसित झाला. पण वाढत्या वाहतुकीमुळे घाटातील वळणं आणि अपघातांची समस्या वाढू लागली. यावर उपाय म्हणून २००२ मध्ये मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग सुरू करण्यात आला. हा भारतातील पहिला सहा पदरी द्रुतगती मार्ग ठरला. प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी झाला आणि वेगाला नवे परिमाण मिळाले. पुण्याच्या विकासासाठीही मोठे सकारात्मक परिणाम झाले.
औद्योगिक आणि आयटी विकासाला मोठी चालना
पूर्वी मुंबई आणि पुणे यांच्यातील प्रवास वेळखाऊ होता. द्रुतगती मार्गामुळे हा वेळ मोठ्या प्रमाणात कमी झाला. त्यामुळे पुणे हे मुंबईला पर्यायी औद्योगिक आणि माहिती तंत्र… …
युवराज पाटील
जिल्हा माहिती अधिकारी पुणे