सांगलीत नोव्हेंबरमध्ये होणार देशातील पहिले ‘पुरोगामी साहित्य संमेलन’; खा. शरद पवार यांना ‘पुरोगामी युगपुरुष’ पुरस्काराने गौरवणार

माजी अर्थमंत्री जयंतराव पाटील संमेलनाचे अध्यक्ष; पुरोगामी संघर्ष परिषदेची पुण्यात घोषणा

पुणे, १८ मे २०२६: देशातील वाढत्या प्रतिगामी शक्तींना वैचारिक उत्तर देण्यासाठी आणि पुरोगामी विचारांची मशाल अधिक प्रज्वलित करण्यासाठी ‘पुरोगामी संघर्ष परिषदे’च्या वतीने आगामी नोव्हेंबर २०२६ मध्ये सांगली नगरीत ‘देशातील पहिले पुरोगामी साहित्य संमेलन’ आयोजित करण्यात आले आहे. पुरोगामी संघर्ष परिषदेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष डॉ. प्रा. सुभाष वायदंडे यांनी आज पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत या ऐतिहासिक संमेलनाची अधिकृत घोषणा केली.

या संमेलनाचे उद्घाटन देशाचे ज्येष्ठ नेते खा. शरदचंद्रजी पवार साहेब करणार असून, याच व्यासपीठावर त्यांना पुरोगामी संघर्ष परिषद आणि राज्यातील तमाम मातंग समाजाच्या वतीने ‘पुरोगामी युगपुरुष’ या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच, संमेलनाच्या अध्यक्षपदाची धुरा माजी अर्थमंत्री ना. आ. जयंतराव पाटील सांभाळणार आहेत.


खा. शरद पवार यांच्याशी सविस्तर चर्चा व संमती

या संमेलनाच्या आयोजनासंदर्भात डॉ. प्रा. सुभाष वायदंडे यांनी ८ मे रोजी सातारा येथील शासकीय निवासस्थानी खा. शरदचंद्रजी पवार यांची सविस्तर भेट घेतली होती. या भेटीदरम्यान झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर पवार साहेबांनी संमेलनाचे ‘उद्घाटक’ म्हणून उपस्थित राहण्याचे सहर्ष मान्य केले आहे.

संमेलनाचा मुख्य उद्देश: प्रतिगामी विचारांना चपराक

पत्रकार परिषदेत संमेलनाच्या भूमिकेविषयी बोलताना डॉ. प्रा. सुभाष वायदंडे म्हणाले,

“आज देश आणि राज्यामध्ये प्रतिगामी विचारांचा प्रभाव वाढताना दिसत आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन बाजूला सारून अंधश्रद्धेला खतपाणी घातले जात असून समाजाची दिशा भरकटत आहे. लोकांनी विज्ञानवादी बनावे, राज्यकर्ते आणि सामाजिक कार्यकर्त्यांना पुरोगामी विचारांची जाणीव व्हावी आणि सर्व घटकांचा सर्वांगीण विकास साधता यावा, या उद्देशाने या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. पुरोगामी विचारांतून महाराष्ट्र आणि देश कसा घडला, याचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे हेच आमचे मुख्य ध्येय आहे.”


संमेलनाचे नियोजित पदाधिकारी

  • उद्घाटक: खा. शरदचंद्रजी पवार साहेब (नेते, भारत देश)
  • संमेलनाचे अध्यक्ष: ना. आ. जयंतराव पाटील (माजी अर्थमंत्री)
  • स्वागताध्यक्ष व मुख्य आयोजक: डॉ. प्रा. सुभाष वायदंडे (राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष, पुरोगामी संघर्ष परिषद)

राज्यव्यापी दौऱ्याचे नियोजन

या ऐतिहासिक संमेलनाच्या भव्य तयारीसाठी लवकरच एक राज्यव्यापी दौरा करण्यात येणार असून, सांगलीतील हे संमेलन देशाच्या वैचारिक परिवर्तनासाठी मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.

आज पुण्यात झालेल्या या पत्रकार परिषदेला पुरोगामी संघर्ष परिषदेचे पुणे वरिष्ठ जिल्हाध्यक्ष गोकुळ तात्या भिसे, युवक प्रदेशाध्यक्ष मनोज दादा भिसे, पश्चिम महाराष्ट्र सल्लागार कमिटीचे अध्यक्ष प्राचार्य पंढरीनाथ आढाळगे, पुणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुरेश पवार, पुणे युवक जिल्हाध्यक्ष अजित पाटोळे, पुणे महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सारिका आडागळे, दिलीप बाराव, निवृत्ती खुडे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button