
मुंबई, दि. २६ :महाराष्ट्र राज्याचे मा. राज्यपाल श्री. देवव्रत आचार्य यांच्या वतीने लोकभवन, मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या “स्वागत समारंभा”साठी विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांना सस्नेह आमंत्रण देण्यात आले होते. या कार्यक्रमास राज्यपालांच्या पत्नी सौ. दर्शना देवी यांचीही उपस्थिती होती.या निमित्ताने विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मा. राज्यपाल श्री. देवव्रत आचार्य यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान डॉ. गोऱ्हे यांनी “महाराष्ट्र विधानपरिषद शतक महोत्सव” हे विशेष पुस्तक राज्यपालांना भेट म्हणून प्रदान केले. या पुस्तकामध्ये महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शताब्दी वर्षानिमित्त संमत झालेली महत्त्वपूर्ण विधेयके, ठराव तसेच राज्याच्या विकासाला दिशा देणाऱ्या धोरणांचा सविस्तर आढावा देण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या लोकशाही परंपरेचा आणि विधानपरिषदेच्या ऐतिहासिक योगदानाचा समग्र आलेख या पुस्तकातून मांडण्यात आला आहे.या सदिच्छा भेटीदरम्यान राज्याच्या घटनात्मक परंपरा, लोकशाही मूल्ये तसेच विधानपरिषदेच्या कार्याविषयी सकारात्मक आणि विचारपूर्ण चर्चा करण्यात आली. स्वागत समारंभाच्या निमित्ताने झालेली ही भेट अत्यंत सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडली.यानंतर विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचीही सदिच्छा भेट घेतली. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या विकासात्मक वाटचालीसंदर्भात यावेळी अनौपचारिक संवाद झाला.