राजगडावर अवघड गुंजवणे दरवाजा मार्गावर चढाई करताना २१ वर्षीय तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

पुणे दि. 27 : पुणे जिल्ह्यातील ऐतिहासिक राजगड किल्ल्यावर अवघड गुंजवणे दरवाजा मार्गाने चढाई करताना २१ वर्षीय पर्यटकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. नागराज कोरे असे मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे गडप्रेमी आणि पर्यटकांमध्ये मोठी खळबळ उडाली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.नागराज कोरे हा पुण्यातील आपल्या पाच ते सहा मित्रांसोबत राजगड किल्ल्यावर फिरण्यासाठी आला होता. सध्या चोर दरवाजा मार्ग बंद असल्याने पर्यटकांना पर्यायी आणि अधिक अवघड अशा गुंजवणे दरवाजा मार्गाने प्रवास करावा लागत आहे. याच मार्गावर चढाई करत असताना ही दुर्दैवी घटना घडली.मिळालेल्या माहितीनुसार, चढाईदरम्यान नागराजला प्रचंड दम लागला आणि अचानक चक्कर येऊन तो खाली कोसळला. मित्रांनी त्याला धीर देत थोडी विश्रांती घेण्यास सांगितले. काही वेळ विश्रांती घेतल्यानंतर नागराजने पुन्हा चढाई सुरू केली. मात्र, काही अंतर पार केल्यानंतर त्याला पुन्हा धाप लागली आणि छातीत तीव्र वेदना जाणवू लागल्या. काही क्षणांतच तो पुन्हा जमिनीवर कोसळला आणि निपचित पडला.त्याच्या मित्रांनी त्याला शुद्धीवर आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र कोणतीही हालचाल दिसून आली नाही. आजूबाजूच्या पर्यटकांनी तात्काळ धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि मदत पथक घटनास्थळी दाखल झाले.प्राथमिक अंदाजानुसार, गडाची अवघड आणि दमछाक करणारी चढाई करताना अतिश्रमामुळे नागराजला हृदयविकाराचा तीव्र झटका आला असावा, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. या घटनेमुळे किल्ल्यांवरील अवघड ट्रेकिंग करताना आरोग्याची काळजी घेण्याचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button