
लोणावळा, दि. २६ : प्रजासत्ताक दिनाच्या विशेष निमित्ताने सरमाउंट एडवेंचर्स आणि माझे दुर्गवेड ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने लोणावळा येथील प्रसिद्ध नवरा-नवरी सुळखे येथे एक रोमांचक आणि साहसी क्लाइंबिंग इव्हेंट यशस्वीरित्या पार पडला.या इव्हेंटमध्ये प्रसाद चव्हाण, भरत वडमारे, सूरज फटांगारे, नरेंद्रसिंह शेखावत, मल्हार जगताप आणि विनायक मझिरे या अनुभवी क्लाइंबिंग टीमने सहभाग घेतला. टीमने नवरा-नवरी सुळख्यांवरील आव्हानात्मक चढाई अत्यंत कौशल्याने आणि सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करत यशस्वीरित्या पूर्ण केली.या उपक्रमाचा मुख्य उद्देश साहसी खेळांना प्रोत्साहन देणे, युवकांमध्ये निसर्ग व दुर्गभ्रमणाविषयी जागरूकता निर्माण करणे तसेच प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने एक वेगळा आणि प्रेरणादायी उपक्रम राबवणे हा होता.सरमाउंट एडवेंचर्स आणि माझे दुर्गवेड ग्रुप यांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत असून, या इव्हेंटमुळे साहसी खेळांमध्ये रुची असलेल्या तरुणांना नवीन दिशा आणि प्रेरणा मिळाली आहे.