मुळा-मुठा नदीकाठ सुधारणा प्रकल्प अंतिम टप्प्यात; १५ फेब्रुवारीपासून नागरिकांसाठी खुला होणार १.५ किमी ट्रॅक

पुणे दि. 26 : पुणे महानगरपालिकेमार्फत मुळा-मुठा नदीकाठ सुधारणा प्रकल्पाचे नियोजनबद्ध काम प्रगतीपथावर असून पहिल्या टप्प्यातील संगमवाडी ते बंडगार्डन दरम्यानच्या कामाने अंतिम टप्पा गाठला आहे. पुणे शहरातून सुमारे ४४ किलोमीटर लांबीने वाहणाऱ्या मुळा-मुठा नदीपैकी पहिल्या टप्प्यात ३.७ किलोमीटर लांबीच्या नदीकाठ सुधारणा प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले आहे.याशिवाय बंडगार्डन ते मुंढवा दरम्यान ५.५ किलोमीटर तसेच औंध ते बालेवाडी दरम्यान ८.१ किलोमीटर लांबीच्या नदीकाठ सुधारणा प्रकल्पाचे कामही सुरू करण्यात आले आहे. या प्रकल्पाच्या अनुषंगाने नदीकाठालगत उपलब्ध जागेमध्ये थीम पार्कसह विविध नागरी सुविधा विकसित करण्यात येणार आहेत.सध्या संगमवाडी ते बंडगार्डन दरम्यानच्या प्रकल्पाचे सुमारे ९० टक्के काम पूर्ण झाले असून संगमवाडी येथील १.५० किलोमीटर लांबीचा ट्रॅक सर्वार्थाने पूर्ण झाला आहे. या कामाची पाहणी आज दिनांक २६ जानेवारी २०२६ रोजी महापालिका आयुक्त मा. नवल किशोर राम यांच्या उपस्थितीत करण्यात आली. यावेळी अतिरिक्त महापालिका आयुक्त मा. पृथ्वीराज बी. पी. (इस्टेट), मा. पवणीत कौर (जनरल), मा. ओमप्रकाश दिवटे (विशेष) तसेच शहर अभियंता मा. प्रशांत वाघमारे उपस्थित होते. पाहणीदरम्यान वृक्षारोपणही करण्यात आले.पूर्ण झालेल्या १.५० किलोमीटर ट्रॅकचे औपचारिक लोकार्पण पुणे महानगरपालिकेच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून दिनांक १५ फेब्रुवारी २०२६ रोजी करण्यात येणार आहे. हा ट्रॅक नागरिकांसाठी सकाळी ६ ते ९ व सायंकाळी ५ ते ८ या वेळेत चालणे, सायकलिंग व विरंगुळ्यासाठी खुला करण्यात येणार आहे.मार्च २०२६ अखेर संगमवाडी ते कल्याणीनगर दरम्यान सुमारे ५ किलोमीटर लांबीच्या नदीकाठ सुधारणा प्रकल्पाचे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे. नवनिर्वाचित लोकप्रतिनिधी, पदाधिकारी तसेच मान्यवर मंत्र्यांच्या हस्ते लवकरच या प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात येणार असून यामुळे पुणेकरांना निसर्गस्नेही, सुरक्षित व सर्व सुविधांनी युक्त असा सार्वजनिक अवकाश उपलब्ध होणार आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button