
सांगली, दि. 25 : ईश्वर सर्वव्यापी असून सृष्टीच्या कणा–कणामध्ये तो विराजमान आहे. त्या ईश्वराची सतत जाणीव ठेवून जीवन जगल्यासच खरे आत्ममंथन व आंतरिक यात्रा शक्य होते, असे प्रतिपादन निरंकारी सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज यांनी केले.
महाराष्ट्राच्या 59व्या निरंकारी संत समागमाच्या पहिल्या दिवशी, 24 जानेवारी 2026 रोजी सांगली येथील ईश्वरपूर रोडलगत सुमारे 350 एकरच्या विशाल मैदानात आयोजित या तीन दिवसीय समागमात उपस्थित लाखो श्रद्धाळूंना त्या संबोधित करत होत्या. या समागमात महाराष्ट्रासह देशातील विविध राज्ये व परदेशातूनही मोठ्या संख्येने भक्तगण सहभागी झाले आहेत.
सतगुरु माताजी म्हणाल्या की, भक्ती म्हणजे स्वतःमध्ये सुधारणा करण्याची प्रक्रिया आहे. मन निर्मळ ठेवून, नम्रता, सहनशीलता व करुणा या गुणांना अंगीकारत मानवतेच्या मार्गावर चालणे हेच खरे साध्य आहे. संतांनी सदैव इतरांचे अवगुण न पाहता स्वतःमध्ये परिवर्तन घडवण्याची शिकवण दिली आहे.
ब्रह्मज्ञानाचा प्रकाश जीवनात आल्यानंतर भक्ताला इतरांच्या वेदनांची जाणीव होते. दया, करुणा आणि उदार भावनेतून तो इतरांपर्यंतही या ज्ञानाचा प्रकाश पोहोचवण्याचा प्रयत्न करतो, असे त्यांनी सांगितले. आत्ममंथन हा केवळ बौद्धिक तर्काचा विषय नसून तो हृदयातून अनुभवण्याचा विषय आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. पर्यावरण रक्षणाची जबाबदारीही प्रत्येकाची असून बाह्य प्रदूषण दूर करून सृष्टीची सुंदरता जपणे आवश्यक असल्याचे त्या म्हणाल्या.
सेवादल रॅलीने वेधले लक्ष
समागमाच्या दुसऱ्या दिवशी भव्य सेवादल रॅलीचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्रासह देश-विदेशातून आलेल्या हजारो सेवादल सदस्यांनी खाकी-निळ्या गणवेशात सहभागी होत शिस्त, सेवा व समर्पणाचे दर्शन घडवले. पी.टी. परेड, योगा, मानवी पिरॅमिड, मल्लखांब, एरोबिक्स, अंब्रेला फॉर्मेशन अशा विविध सादरीकरणांनी उपस्थितांचे लक्ष वेधले.
सेवादल व भक्तगणांना संबोधित करताना सतगुरु माताजींनी सांगितले की, सेवा ही केवळ कार्य नसून ती श्रद्धा, नम्रता व समर्पित भावनेची साधना आहे. सत्संगालाही सेवेचेच एक रूप मानून जीवनात त्याला प्राधान्य द्यावे.
नूतन साहित्याचे प्रकाशन
समागमाच्या पहिल्या दिवशी सतगुरु माताजींच्या हस्ते समागम विशेषांक “आत्ममंथन”, ‘गुरूदेव हरदेव’ या पुस्तकाच्या नूतन भाषांतर आवृत्तीसह अन्य साहित्याचे प्रकाशन करण्यात आले. हे साहित्य समागमस्थळी उपलब्ध असून भक्तगण मोठ्या उत्साहाने त्याचा लाभ घेत आहेत.
लंगर व कॅंटीन व्यवस्था
समागमात सहभागी सर्व श्रद्धाळूंसाठी दिवस-रात्र सामूहिक लंगरची व्यवस्था करण्यात आली आहे. यासोबतच चार कॅंटीनमधून अत्यल्प दरात अल्पोपहार, चहा, कॉफी व शीतपेय तसेच मिनरल वॉटरची सोय करण्यात आली आहे.