स्वदेशी शस्त्रास्त्र प्रदर्शनातून पुणेकरांना भारतीय सैन्याच्या सामर्थ्याचा थेट अनुभव

पुणे : स्नायपर एमके-१, एअर डिफेन्स गन, अँटी मटेरियल रायफल (विध्वंसक), एके-४७ रायफल, एमएमजी गन, टिअर गॅस गन यांसह ड्रोन, आर्टिलरी अम्युनिशन, एरियल बॉम्ब अशा अत्याधुनिक व स्वदेशी शस्त्रास्त्रांचे दर्शन पुणेकरांना प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर घडले आहे. भारतीय सैन्याची सज्जता आणि आत्मनिर्भर संरक्षण क्षमता अधोरेखित करणारे हे भव्य प्रदर्शन पुण्यात आयोजित करण्यात आले आहे.श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने, म्युनिशन्स इंडिया लिमिटेड यांच्या सहकार्याने बुधवार पेठेतील लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिरासमोर असलेल्या जय गणेश प्रांगण येथे भारतीय बनावटीच्या शस्त्रास्त्रांचे दोन दिवसीय प्रदर्शन भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते करण्यात आले.उद्घाटनप्रसंगी आमदार व ट्रस्टचे सरचिटणीस हेमंत रासने, म्युनिशन्स इंडिया लिमिटेडचे मुख्य महाव्यवस्थापक अरुण ठाकूर, कर्नल बद्रीदत्त गनोला, ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण यांच्यासह यतीश रासने, सौरभ रायकर, मंगेश सूर्यवंशी, सचिन आखाडे, अजय मोझर, रुणाल केसरकर, अंकुश रासने, लष्करातील माजी अधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी व मान्यवर उपस्थित होते.प्रदर्शनात भारतीय पायदळ, नौदल आणि हवाई दलासाठी वापरली जाणारी शस्त्रास्त्रे, दारुगोळा तसेच युद्धसज्जतेसाठी आवश्यक विविध साधनांची मॉडेल्स ठेवण्यात आली आहेत. ग्रेनेड, रॉकेटचे विविध प्रकार, लढाऊ विमानातील बॉम्ब, मल्टी बॅरल लॉन्च सिस्टिम, अँटी सबमरीन रॉकेट, विविध प्रकारचे ड्रोन आणि तोफांसाठी लागणारा दारुगोळा पाहण्याची संधी नागरिकांना मिळत आहे.ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने यांनी सांगितले की, भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या म्युनिशन्स इंडिया लिमिटेडकडून पुण्यात निर्मिती होणारी आणि देशासह विविध राष्ट्रांना निर्यात केली जाणारी स्वदेशी शस्त्रास्त्रे पुणेकरांना जवळून पाहता येत आहेत. दि. २६ जानेवारी २०२६ पर्यंत सकाळी १० ते रात्री १० या वेळेत हे प्रदर्शन खुले राहणार आहे.सैन्यदलातील जवान या प्रदर्शनाच्या नियोजनात सक्रिय सहभागी असून, प्रत्येक शस्त्राविषयी सविस्तर माहिती नागरिकांना तात्काळ दिली जात आहे. आत्मनिर्भर, बलशाली आणि विश्वगुरू भारताच्या संकल्पनेला बळ देणाऱ्या या उपक्रमाला पुणेकरांनी मोठ्या संख्येने भेट द्यावी, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे. प्रदर्शनासाठी प्रवेश पूर्णतः विनामूल्य आहे.फोटो ओळ :श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त बुधवार पेठेतील जय गणेश प्रांगण येथे आयोजित स्वदेशी शस्त्रास्त्र प्रदर्शनाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button