
पुणे, दि. 25 जानेवारी (जिमाका वृत्तसेवा) –लोकशाही ही केवळ राज्यघटनेतील संकल्पना नसून ती प्रत्येक नागरिकाच्या दैनंदिन आचरणातून जिवंत राहते. मतदानाचा अधिकार हा केवळ हक्क नसून तो प्रत्येक नागरिकाचे महत्त्वाचे कर्तव्य आहे. युवकांनी विशेषतः मतदान प्रक्रियेत सक्रिय सहभाग घ्यावा, लोकशाही मूल्यांची जपणूक करावी आणि संविधानाने दिलेल्या स्वातंत्र्याची जबाबदारीने कदर करावी, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी सतीश राऊत यांनी केले.राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातील बहुउद्देशीय सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मतदार नोंदणी व निवडणूक प्रक्रियेत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.कार्यक्रमास उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर, प्रमुख पाहुणे मेजर अर्चिस सबनीस, विंग कमांडर वैष्णवी टोकेकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी ‘उत्कृष्ट मतदार नोंदणी अधिकारी – २०२६’ हा पुरस्कार पिंपरी विधानसभा मतदारसंघातील श्रीमती अर्चना यादव-पोळ यांना प्रदान करण्यात आला. तसेच ‘उत्कृष्ट सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी’ म्हणून जुन्नर विधानसभा मतदारसंघातील श्री. सुनील शेळके यांचा सन्मान करण्यात आला. निवडणूक नायब तहसीलदार प्रवर्गात आंबेगाव येथील श्री. सचिन वाघ आणि शिवाजीनगर येथील श्रीमती सायली धस, तर निवडणूक लिपीक प्रवर्गात शिवाजीनगर येथील श्रीमती अर्चना सानप यांना गौरविण्यात आले.मतदारसंघनिहाय उत्कृष्ट पर्यवेक्षक व उत्कृष्ट मतदार केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) पुरस्कारही विविध विधानसभा मतदारसंघातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रदान करण्यात आले.कार्यक्रमादरम्यान उपस्थितांना मतदार जनजागृतीसाठी मतदार प्रतिज्ञा देण्यात आली. तसेच वासुदेव आसाराम कसबे यांनी सादर केलेले मतदार जनजागृती गीत उपस्थितांच्या मनाला भावून गेले.प्रमुख पाहुणे मेजर अर्चिस सबनीस व विंग कमांडर वैष्णवी टोकेकर यांनीही लोकशाहीमध्ये मतदाराचे महत्व विशद केले. उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर यांनी राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यामागील उद्देश आपल्या प्रास्ताविकात स्पष्ट केला.राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त चित्र प्रदर्शनभारतीय लोकशाहीतील मतदाराचे महत्व अधोरेखित करणारे आकर्षक चित्र प्रदर्शन पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या तळमजल्यावर भरविण्यात आले आहे. नवमतदार युवक-युवतींनी या प्रदर्शनाला मोठ्या उत्साहाने भेट देत मतदानाचे महत्त्व अधोरेखित केले.