
पुणे :प्रजासत्ताक दिन सप्ताहानिमित्त सुरू असलेल्या देशव्यापी जनजागृती मोहिमेअंतर्गत पुण्यातील युवकांनी भारतातील दुग्ध उत्पादन आणि बीफ निर्यात उद्योगातील परस्परसंबंधांवर प्रकाश टाकणारे प्रभावी आंदोलन केले. युवक-नेतृत्वाखालील पशुहक्क संघटना पुणे एनिमल लिबरेशन यांच्या वतीने जे.एम. रोडवरील संभाजी उद्यान येथे तथ्याधारित दृश्य प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते.या प्रदर्शनीत भारत हा जगातील सर्वाधिक दूध उत्पादक देश असतानाच बीफ निर्यातीतही आघाडीवर असल्याची माहिती मांडण्यात आली. सरकारी व आंतरराष्ट्रीय आकडेवारीनुसार, भारतात दरवर्षी सुमारे २३० मिलियन टनांहून अधिक दूध उत्पादन होत असून, त्याचबरोबर १.३ मिलियन टनांहून अधिक बीफ निर्यात केली जाते. यामागे दुग्ध पुरवठा साखळीच अप्रत्यक्षपणे बीफ उद्योगाला चालना देत असल्याचा दावा कार्यकर्त्यांनी केला.दूध देण्याची क्षमता कमी झाल्यानंतर किंवा आर्थिकदृष्ट्या तोटा होऊ लागल्यावर अनेक पशूंना विकले जाते आणि ते थेट मांस उद्योगात ढकलले जातात. त्यामुळे दुग्ध उद्योग आणि बीफ व्यापार हे वेगवेगळे नसून एकमेकांशी घट्ट जोडलेले असल्याचे या उपक्रमातून स्पष्ट करण्यात आले.शहरातील रस्त्यांवर जखमी, कुपोषित आणि दूध देणे बंद केलेल्या गायी दिसणे ही याची जिवंत उदाहरणे असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले. पुण्यातील अनेक भागांत अशा गायी प्लास्टिक व कचरा खाताना दिसत असून, ही बाब अत्यंत चिंताजनक असल्याचेही त्यांनी नमूद केले.यावेळी पशुहक्क कार्यकर्ता प्रविण म्हणाले,“दूध देणे बंद केल्यानंतर रस्त्यावर दिसणाऱ्या अनेक गायी या जवळच्या डेअऱ्यांमधूनच आलेल्या असतात, ही बाब बहुतांश नागरिकांना माहीत नसते. दूध आणि मांस उद्योगातील हा संबंध समजून घेण्यासाठी ‘माँ का दूध’ ही माहितीपरक डॉक्युमेंटरी पाहणे आवश्यक आहे.”पशुहक्क कार्यकर्त्या श्वेता बोरगांवकर यांनी सांगितले,“दूध आणि मांस उद्योग वेगवेगळे आहेत असा समज समाजात रूढ आहे. मात्र आकडेवारी पाहिली तर हे दोन्ही एकाच साखळीचे भाग आहेत. पशु दूध देण्यास अनुपयोगी ठरले की त्यांना मांस उद्योगात ढकलले जाते. या वास्तवाबाबत जनजागृती होणे अत्यंत गरजेचे आहे.”तर चेतन शिंदे म्हणाले,“मांस उत्पादनाची ‘गुलाबी क्रांती’ नसती, तर दुग्ध उत्पादनाची ‘धवल क्रांती’ शक्यच झाली नसती. दूधाच्या वाढत्या मागणीमुळे अशा पशूंची संख्या वाढते, ज्यांची जबाबदारी शेवटी कत्तल उद्योगावर येते. या दोन्ही उद्योगांकडे स्वतंत्रपणे पाहण्याची मानसिकता बदलण्याची गरज आहे.”आयोजकांच्या माहितीनुसार, पुण्यासह ठाणे, बेंगळुरू, जयपूर आणि देशातील इतर नऊ शहरांतील गर्दीच्या सार्वजनिक ठिकाणीही अशाच प्रकारच्या प्रदर्शने आयोजित करण्यात आली आहेत. दुग्ध उद्योग आणि मांस व्यापारातील अटळ संबंधावर पसरलेले मौन तोडणे, हाच या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.