
“निसर्गसंवर्धन ही केवळ सरकारचीच नव्हे, तर समाजातील प्रत्येक घटकाची सामूहिक जबाबदारी आहे. आज हरित सेनेची नितांत गरज असून, त्यामुळे खाकी सेना आता हरित सेनेच्या रूपात कार्य करणार आहे,” असे प्रतिपादन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी केले. या उपक्रमात प्रत्येक पोलीस अधिकारी व कर्मचारी सक्रिय सहभाग घेईल, असेही त्यांनी नमूद केले.
उद्घाटन कार्यक्रमाची सुरुवात ज्येष्ठ पर्यावरण तज्ञ आणि पद्मभूषण पुरस्कार प्राप्त डॉ. माधव गाडगीळ यांना श्रद्धांजली अर्पण करून करण्यात आली. यावेळी पोलीस आयुक्तांनी सांगितले की, पर्यावरणाचे संरक्षण ही एका संस्थेची जबाबदारी नसून समाजातील प्रत्येक घटकाने त्यात योगदान देणे अत्यावश्यक आहे आणि पुणे पोलीस ही जबाबदारी अत्यंत गांभीर्याने पार पाडेल.
या कार्यक्रमास अनुपमा बर्बे (जॉइंट सेक्रेटरी), सुमन किर्लोस्कर (अध्यक्ष, प्रदर्शनी समिती), सुरेश पिंगळे (उपाध्यक्ष, प्रदर्शनी समिती) यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यंदा एम्प्रेस गार्डनमधील पुष्पप्रदर्शनाने आपल्या अनोख्या व कलात्मक सादरीकरणामुळे नागरिकांचे लक्ष वेधून घेतले आहे. जपानी पद्धतीतील इकेबाना पुष्परचना, विविध प्रकारचे बोन्साय वृक्ष, तसेच दुर्मिळ वनस्पती या प्रदर्शनाचे प्रमुख आकर्षण ठरले आहेत.
या प्रदर्शनात पुण्यासह कोल्हापूर, सांगली, नाशिक तसेच इतर राज्यांतील नामांकित नर्सरी व्यावसायिकांनी सहभाग घेतला असून, त्यांच्या दुर्मिळ आणि आकर्षक वनस्पतींनी बागकामप्रेमींचे विशेष लक्ष वेधले आहे.
बागकामप्रेमींसाठी गुलाब पुष्प स्पर्धा, फळ-भाजी स्पर्धा, आकर्षक कुंड्यांच्या स्पर्धा यांचे आयोजन करण्यात आले असून, नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे. हे पुष्पप्रदर्शन २३ ते २७ जानेवारी या कालावधीत खुले असून, अधिकाधिक नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.