
पुणे : भारत माता की जयच्या गगनभेदी जयघोषात पुण्यात तिरंगा पूजनाचा प्रेरणादायी आणि देशभक्तीपूर्ण कार्यक्रम उत्साहात पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘घरघर तिरंगा’ अभियानांतर्गत जम्मू–काश्मीरमधील भारत–पाक सीमेवरील पुच्छ जिल्ह्यासाठी ९ मराठा रेजिमेंटच्या माध्यमातून १,००० तिरंग्यांचे वितरण करण्यात येणार आहे. हे तिरंगे सीमावर्ती भागातील घराघरांपर्यंत पोहोचवले जाणार आहेत.या उपक्रमासाठी आम्ही पुणेकर संस्थेच्या पुढाकाराने पुण्यात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जांभूळवाडी येथील विवा सरोवर परिवाराच्या वतीने दत्त मंदिरात या तिरंग्यांचे विधीवत पूजन करण्यात आले.या देशसेवेच्या अभियानात महिलांचा सक्रिय सहभाग हे या उपक्रमाचे विशेष वैशिष्ट्य ठरले. देशप्रेम, एकात्मता आणि सामाजिक बांधिलकी जपत महिलांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला.या उपक्रमामुळे देशाविषयीचा अभिमान अधिक दृढ झाला असून, सीमेवर तैनात असलेल्या जवानांना यामुळे निश्चितच प्रेरणा मिळेल, अशी भावना उपस्थित महिलांनी व्यक्त केली.या वेळी विवा सरोवर सोसायटी महिला भजनी मंडळाच्या प्रेरणा मिसाळ, सोनिया इथापे, अंजली काळबांडे, मिठी मोहंती, राधिका कुरळे, वनिता डोंगरे आदी उपस्थित होत्या.