
पुणे, दि. 24 : दरवर्षी २५ जानेवारी रोजी साजऱ्या होणाऱ्या राष्ट्रीय पर्यटन दिनाच्या निमित्ताने यंदाचे वर्ष पुणे जिल्ह्यासाठी विशेष ठरणार आहे. जिल्हा प्रशासनाच्या नियोजनातून २३ जानेवारी रोजी यशस्वीरीत्या पार पडलेल्या ‘बजाज पुणे ग्रँड टूर २०२६’ या आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेमुळे पुणे जिल्ह्याचा पर्यटन नकाशा थेट जागतिक व्यासपीठावर पोहोचला आहे.
ही स्पर्धा केवळ क्रीडा आयोजनापुरती मर्यादित न राहता पुण्याचा इतिहास, सांस्कृतिक वारसा, सह्याद्रीचा निसर्ग, कृषी परंपरा आणि ग्रामीण जीवनशैली यांचा भव्य जागतिक ‘शोकेस’ ठरली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची गाथा, राजगड, पुरंदरसारखे ऐतिहासिक किल्ले, तसेच भोर–वेल्हे परिसरातील निसर्गसौंदर्य आता जागतिक पर्यटकांच्या केंद्रस्थानी येणार आहे.
पुरंदरमधील अंजीर व सीताफळासारखी कृषी उत्पादने, शेतभेटी, ग्रामीण जेवण आणि स्थानिक संस्कृतीचा अनुभव देणारे कृषी पर्यटनही या निमित्ताने नवे बळ मिळणार आहे. यामुळे पर्यटन शहरकेंद्रित न राहता थेट ग्रामीण भागापर्यंत पोहोचणार असून, स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे.
‘पुणे ग्रँड टूर’मुळे ग्रामीण रस्ते, कनेक्टिव्हिटी, होमस्टे, स्थानिक मार्गदर्शक, महिला बचतगट आणि युवकांच्या स्टार्टअप्ससाठी नव्या संधी उपलब्ध होणार आहेत. राष्ट्रीय पर्यटन दिनाच्या निमित्ताने पुणे जिल्हा आता केवळ शिक्षण व आयटी केंद्र न राहता, जागतिक पर्यटन केंद्र म्हणून आपली ठळक ओळख निर्माण करत असल्याचे स्पष्ट होत आहे.