
पुणे, दि. 24 : राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने राज्यातील विविध ठिकाणी देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून पुणे महसूल विभागासाठी ‘वंदे मातरम्’ हा विशेष देशभक्तीपर गीत व नृत्याविष्काराचा कार्यक्रम सोमवार, दि. २६ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता पंडित भीमसेन जोशी नाट्यमंदिर, औंध, पुणे येथे आयोजित करण्यात आला आहे.
सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम सादर केला जाणार आहे. मराठी व हिंदी देशभक्तीपर गीतांसह सादर होणाऱ्या नृत्याविष्कारातून राष्ट्रप्रेमाची भावना जागविण्याचा प्रयत्न या कार्यक्रमातून करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमात प्रसिद्ध गायक डॉ. अभिजित कोसंबी, दीक्षा जाधव, भूमी जाधव यांच्यासह मराठी संगीत मालिकेतील वादक सुनील जाधव तसेच आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शिटीवादक निखिल राणे सहभागी होणार आहेत. सुरेल गीतांच्या सादरीकरणातून रसिकांना देशभक्तीची संगीतमय अनुभूती मिळणार आहे.
किंकणी कला ॲकॅडमी निर्मित या कार्यक्रमात गीत, संगीत आणि नृत्याचा सुरेख संगम अनुभवता येणार असून, हा कार्यक्रम सर्व नागरिकांसाठी प्रवेश विनामूल्य आहे. अधिकाधिक नागरिकांनी उपस्थित राहून या देशभक्तीपर सांस्कृतिक मेजवानीचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे यांनी केले आहे.