
पुणे24 : ‘पुणे प्राइड लूप’मध्ये उसळलेल्या प्रचंड गर्दीच्या आणि उत्साहपूर्ण वातावरणात ‘बजाज पुणे ग्रँड टूर २०२६’चा शुक्रवारी शानदार समारोप झाला. पुण्यातील निर्णायक टप्प्यात ‘ली निंग स्टार’ संघाच्या ल्यूक मुडग्वेने बाजी मारली, तर संपूर्ण स्पर्धेचे सांघिक विजेतेपदही ली निंग स्टार संघाने पटकावले. चौथ्या व अंतिम टप्प्यात संघाच्याच श्नायर्को अॅलिक्सेईने १ तास ५६ मिनिटे ५४ सेकंद वेळेसह विजय मिळवला.
पाच दिवस चाललेल्या या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेमुळे भारतासह पुण्याचे नाव जागतिक क्रीडा नकाशावर ठळकपणे झळकले. चौथ्या टप्प्यात सायकलस्वारांनी शहराच्या मध्यभागातून ९५ किलोमीटरचा प्रवास केला. ५७८ मीटरची चढण पार करत ही शर्यत शनिवारवाड्यासारख्या ऐतिहासिक वास्तूंच्या साक्षीने पार पडली. चार टप्प्यांत एकूण ४३७ किलोमीटर अंतर कापण्यात आले.
ल्यूक मुडग्वेचा निर्विवाद दबदबा
ल्यूक मुडग्वेने पहिल्या दोन टप्प्यांत विजय मिळवत स्पर्धेच्या सुरुवातीलाच आघाडी घेतली. त्याने ९ तास ३३ मिनिटे ०४ सेकंद या एकूण वेळेत स्पर्धा पूर्ण करत सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. थायलंडच्या ‘रूजाई इन्शुरन्स विनस्पीड’ संघाचा एलन कार्टर बेटल्स केवळ १४ सेकंदांनी मागे राहिला, तर बेल्जियमच्या ‘टार्टेलेटो-आयसोरेक्स’ संघाचा योर्बेन लॉरीसेन ३३ सेकंदांच्या फरकाने तिसऱ्या क्रमांकावर राहिला.
ल्यूकने पहिल्या दिवशी ‘मुळशी–मावळ माईल्स’ टप्प्यात मिळवलेली यलो जर्सी अखेरपर्यंत राखली. सातत्यपूर्ण कामगिरीमुळे त्याने ग्रीन जर्सी (सर्वाधिक गुण) देखील आपल्या नावे केली.
पुणेकरांच्या गर्दीने ल्यूक भारावला
विजयानंतर ल्यूक म्हणाला, “हा विजय माझ्या संघाचा आहे. प्रत्येक टप्प्यावर संघाने मला साथ दिली. पुण्यातील प्रेक्षकांचा उत्साह अविस्मरणीय आहे. संपूर्ण मार्गावर उभ्या असलेल्या लोकांच्या रांगा पाहून मी भारावून गेलो. पुढील वर्षी पुन्हा पुण्यात यायला मला नक्कीच आवडेल.”
जागतिक दर्जाचे आयोजन – युसीआय
‘युनियन सायकलिस्ट इंटरनॅशनल’च्या महासंचालक अमिना लानाया म्हणाल्या, “पहिल्याच आयोजनात भारताने जागतिक दर्जाची स्पर्धा यशस्वी करून दाखवली. सायकलिंगला भारतात क्रिकेटसारखे लोकप्रिय स्थान मिळावे, हेच आमचे ध्येय आहे.”
ही स्पर्धा लॉस एंजेलिस २०२८ ऑलिंपिकसाठी रँकिंग पॉइंट्स देणारी असल्याने तिला विशेष महत्त्व होते.
मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण
विजेत्यांना अभिनेता आमिर खान यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, मंत्री चंद्रकांतदादा पाटील, खासदार मेधा कुलकर्णी, युसीआय महासंचालक अमिना लानाया यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. आमिर खान यांनी विजेत्यांसह संपूर्ण आयोजन पथकाचे कौतुक केले.
इतर विजेते
पोलका डॉट जर्सी (किंग ऑफ द माउंटेन्स): क्लेमेंट अलेनो (बर्गोस बर्पेललेट बीएच)
ऑरेंज जर्सी (सर्वोत्कृष्ट आशियाई): जंबलजाम्ट्स सैनबायर (बर्गोस बर्पेललेट बीएच)
व्हाईट जर्सी (सर्वोत्कृष्ट युवा): तिज्सेन विगो (नेदरलँड्स)
ब्लू जर्सी (सर्वोत्कृष्ट भारतीय): हर्षवीर सिंग सेखॉन
सर्वोत्कृष्ट तीन भारतीय: हर्षवीर सिंग सेखॉन, मानव सारडा, दिनेश कुमार