साईबाबांच्या पालखीतील अढळ श्रद्धेवर आधारित ‘पालखी’ चित्रपटाचा भक्तिमय मुहूर्त संपन्न

पुणे दि. 23 : श्रद्धा ही केवळ भावना नसून आयुष्याला नवी दिशा देणारी शक्ती आहे. साईबाबांच्या कृपेवर आणि भक्तांच्या अढळ विश्वासावर आधारित ‘पालखी’ हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. साईबाबांवरील निस्वार्थ भक्ती, पालखीची सेवा आणि श्रद्धेचा अध्यात्मिक प्रवास मांडणाऱ्या या चित्रपटाचा मुहूर्त आमदार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते असंख्य साईभक्तांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरणात नुकताच पार पडला.केएसआर फिल्म्स निर्मित ‘पालखी’ चित्रपटाचे लेखन निखिल चंद्रकांत पाटील यांनी केले असून दिग्दर्शनाची धुरा श्रेयश राज आंगणे यांनी सांभाळली आहे. या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते प्रभू कापसे आहेत.या चित्रपटात सिद्धार्थ बोडके, यतिन कार्येकर, प्रवीण तरडे, सुबोध भावे, किशोर कदम, गौरी नलावडे, वीणा जामकर, संदीप गायकवाड, शंतनू रांगणेकर, ओंकार कदम आणि अथर्व रुके असे मराठी चित्रसृष्टीतील अनेक नामवंत कलाकार एकत्र झळकणार आहेत.मुहूर्तप्रसंगी आमदार रवींद्र चव्हाण म्हणाले, “साईबाबांची लीला अगाध आहे. मी स्वतः साईभक्त आहे. साईबाबांच्या पालखीवर आधारित हा चित्रपट लाखो भक्तांना प्रेरणा देईल, असा मला विश्वास आहे.” त्यांनी चित्रपटाच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या.दिग्दर्शक श्रेयश राज आंगणे यांनी सांगितले, “पालखी म्हणजे श्रद्धेची चालती-बोलती अनुभूती आहे. पालखीसोबत चालताना अहंकार गळून पडतो आणि भक्तीची अपार ऊर्जा अनुभवायला मिळते. हीच ऊर्जा प्रेक्षकांना या चित्रपटातून मिळेल.”‘पालखी’ हा चित्रपट एका सामान्य युवकाच्या जीवनातील संघर्ष, प्रश्न आणि वेदनांच्या अंधारातून आशेच्या प्रकाशाकडे नेणारा भावनिक आणि आध्यात्मिक प्रवास उलगडतो. चित्रपटाची पटकथा व संवाद निखिल चंद्रकांत पाटील आणि श्रेयश राज आंगणे यांचे आहेत.छायांकन – हरेश सावंत,संकलन – प्रशांत खेडेकर,कलादिग्दर्शन – नितेश नांदगावकर,संगीत – श्रेयश राज आंगणे,रंगभूषा – राजेश वाळवे,वेशभूषा – सिद्धी योगेश गोहिल,तर साहसदृश्यांची जबाबदारी रवी दिवाण यांनी सांभाळली आहे.साईबाबांच्या भक्तीचा, श्रद्धेचा आणि आत्मिक परिवर्तनाचा अनुभव देणारा ‘पालखी’ हा चित्रपट साईभक्तांसह सर्व प्रेक्षकांसाठी एक भावस्पर्शी अनुभूती ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button