दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाला पहाटेपासूनच भाविकांची गर्दी; आज दुपारी १२ वाजता सुवर्णपाळण्यात गणेशजन्म सोहळा

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळ यांच्या वतीने गणेश जन्मोत्सवाचा पावन सोहळा माघ शुद्ध चतुर्थी निमित्त आज बुधवार पेठेतील श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात मोठ्या भक्तिभावात साजरा होत आहे. या निमित्ताने पहाटेपासूनच गणरायाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळली आहे.विनायक अवतार असलेल्या श्रीगणेशाचा जन्मसोहळा यंदाही परंपरेनुसार सुवर्णपाळण्यात दुपारी ठीक १२ वाजता पार पडणार आहे. या सोहळ्यात पारंपरिक वेशातील महिलांचा सहभाग असून जन्मक्षणी पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. यावेळी श्रीगणेशाची मंगल आरती होणार आहे.गणेश जन्मोत्सवानिमित्त मंदिरात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पहाटे ३ वाजता ब्रह्मणस्पती सूक्त अभिषेक तसेच गणेशसूक्त अभिषेकास प्रारंभ झाला. सकाळी ६ ते १० आणि दुपारी १.३० ते सायंकाळी ५ या वेळेत गणेशयाग आयोजित करण्यात आला आहे. संपूर्ण मंदिर आकर्षक पुष्पसजावट आणि विद्युत रोषणाईने उजळून निघाले आहे.सायंकाळी ६ वाजता श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरातून नगरप्रदक्षिणा मिरवणूक निघणार असून रात्री ८ वाजता मंगल आरती होईल. त्यानंतर रात्री १० ते पहाटे ३ वाजेपर्यंत श्रीगणेश जागर आयोजित करण्यात आला आहे. गणेशजन्माच्या दिवशी पहाटे ३ वाजल्यापासून मंदिर भाविकांसाठी खुले ठेवण्यात आले आहे. भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button