श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंदिरात गणेश जन्मोत्सव उत्साहात साजरा; दिवसभर धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल

पुणे, दि. 22— हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती म्हणून ओळख असलेल्या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंदिरात श्री गणेश जन्मोत्सव मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात साजरा करण्यात आला. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या वतीने दिवसभर विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिर आणि रंगारी भवनाची फुलांची आकर्षक सजावट तसेच विद्युत रोषणाई करण्यात आली होती. सकाळी साडेपाच ते साडेआठ या वेळेत बाप्पाचा अभिषेक पार पडला. त्यानंतर कोहलर इंडिया कॉर्पोरेशन प्रा. लि.चे विक्री प्रमुख सुहास कुलकर्णी आणि त्यांच्या सुविद्य पत्नी यांच्या हस्ते श्रींची आरती करण्यात आली.सकाळी नऊ ते दुपारी बारा या वेळेत गणेश याग संपन्न झाला. त्यानंतर सरस्वती भजनी मंडळाच्या वतीने भक्तिमय भजन कार्यक्रम पार पडला. दुपारी चार ते सायंकाळी पाच या वेळेत ‘बीव्हीआय ग्रुप’च्या वतीने अथर्वशीर्ष पठण करण्यात आले.सायंकाळी बाप्पाची पालखी नगर प्रदक्षिणा काढण्यात आली. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंदिरातून निघालेली पालखी फरासखाना, तांबडी जोगेश्वरी मंदिर, आप्पा बळवंत चौक, दक्षिणमुखी मारुती मंदिर मार्गे पुन्हा मंदिरात परतली. या प्रदक्षिणा मार्गावर फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. मोठ्या संख्येने भाविक या नगर प्रदक्षिणेत सहभागी झाले होते.रात्री साडेआठ वाजता हुतात्मा शिवराम हरि राजगुरू यांचे वंशज सत्यशील राजगुरू यांच्या हस्ते महाआरती संपन्न झाली. त्यानंतर भाऊरंगारी भजनी मंडळाच्या वतीने भजन कार्यक्रम झाला. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष संजीव जावळे, उत्सव प्रमुख व विश्वस्त पुनीत बालन यांच्यासह ट्रस्टचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि गणेशभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button