
पुणे, दि. २२ जानेवारी २०२६ :२४ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (पिफ) २०२६ च्या भव्य समारोप सोहळ्यात आज विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चित्रपटांना मानाच्या पुरस्कारांनी गौरविण्यात आले. यंदाचा सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार ‘द एलिशियन फील्ड’ या चित्रपटाला, तर सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट पुरस्कार ‘बाप्या’ या चित्रपटाला प्रदान करण्यात आला.हा मानाचा पुरस्कार महाराष्ट्र चित्रपट आणि सांस्कृतिक रंगभूमी विकास प्राधिकरणाचे सह व्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजनीकर आणि आंतरराष्ट्रीय ज्यूरी सदस्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.पुणे फिल्म फाउंडेशन, सांस्कृतिक कार्य विभाग (महाराष्ट्र शासन) आणि दादासाहेब फाळके चित्रनगरी, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने हा महोत्सव १५ ते २२ जानेवारी २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आला होता.बालगंधर्व रंगमंदिर येथे झालेल्या भव्य समारंभाला महोत्सवाचे अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल, आंतरराष्ट्रीय ज्यूरी सदस्य बी. जयमोहन (भारत), पिटर केरेकेस (स्लोव्हाकिया), रीट्टा आल्टो (फिनलंड), सिनू रामासामी (भारत), सेर्गी कासामीतजाना (स्पेन), येसिम उस्ताओग्लू (तुर्कस्थान), विविध देशांचे कॉन्सूल जनरल, टाटा मोटर्सचे व्यवस्थापक आनंद आगाशे, पुणे फिल्म फाउंडेशनचे विश्वस्त, ‘पिफ’चे उपसंचालक विशाल शिंदे, आदिती अक्कलकोटकर यांची प्रमुख उपस्थिती होती.महाराष्ट्र शासनाचा “प्रभात” सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (₹१० लाख रोख) प्रदीप कुरबाह दिग्दर्शित आणि मोर्जिना कुरबाह, अर्पणा कुरबाह व जोवा कुरबाह निर्मित ‘द एलिशियन फील्ड’ या चित्रपटाला प्रदान करण्यात आला. यातील ₹५ लाख दिग्दर्शकांना तर ₹५ लाख निर्मात्यांमध्ये समान वाटप करण्यात येणार आहे.तसेच “प्रभात” सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट दिग्दर्शक पुरस्कार (₹५ लाख) ‘अॅडम्स सेक’ या चित्रपटासाठी लॉरा वँडेल यांना प्रदान करण्यात आला.‘लॉस्ट लँड’ या चित्रपटासाठी निर्माते स्टेफान ल्होएस्ट, डेल्फिन टॉमसन व मेरी-अँज लुसियानी यांना ज्यूरी विशेष उल्लेख प्रमाणपत्र देण्यात आले.मराठी चित्रपट स्पर्धेत, महाराष्ट्र शासनाचा ‘संत तुकाराम’ सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट पुरस्कार (₹५ लाख) समीर तिवारी दिग्दर्शित आणि समीर तिवारी व मुक्तल तेलंग निर्मित ‘बाप्या’ या चित्रपटाला प्रदान करण्यात आला.इतर प्रमुख पुरस्कार पुढीलप्रमाणे –सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : संतोष डावखर – ‘गोंधळ’सर्वोत्कृष्ट अभिनेता : गिरीश कुलकर्णी – ‘बाप्या’सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : राजश्री देशपांडे – ‘बाप्या’सर्वोत्कृष्ट छायाचित्रकार : अमलेंदू चौधरी – ‘गोंधळ’सर्वोत्कृष्ट पटकथा : इरावती कर्णिक – ‘तो ती आणि फुजी’याशिवाय ‘जीव’ चित्रपटाचे दिग्दर्शक रवींद्र माणिक जाधव आणि ‘तो ती आणि फुजी’ चित्रपटातील अभिनयासाठी ललित प्रभाकर यांना ज्यूरी विशेष उल्लेख प्रमाणपत्र देण्यात आले.एफटीआयआयचा विद्यार्थी शुभम सुमित याला ‘पिफ’चा विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आला.