
झी स्टुडिओज प्रस्तुत आणि झणकर फिल्म्स निर्मित आगामी मराठी चित्रपट ‘रुबाब’ सध्या प्रेक्षकांमध्ये विशेष चर्चेत आहे. ‘तुझ्यासारखी नको… तूच पाहिजे’ हा संवाद बोलणारा संभाजी ससाणे आणि जिच्यासाठी हा संवाद आहे ती शीतल पाटील — ही फ्रेश, डॅशिंग जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. मात्र या यशामागे एक संघर्षमय आणि रंजक प्रवास दडलेला आहे.विशेष म्हणजे, या दोन्ही कलाकारांना सुरुवातीला ऑडिशनमध्ये नकार देण्यात आला होता. तरीही पुढे तेच ‘रुबाब’चे हिरो–हिरोईन कसे बनले, याची ही प्रेरणादायी कहाणी आहे.आपल्या निवडीबद्दल बोलताना संभाजी ससाणे सांगतो, “ऑडिशननंतर मला स्पष्ट सांगण्यात आलं होतं की, आम्ही जसा मुलगा शोधतोय, तू तसा नाहीस. त्या क्षणी थोडंसं वाईट वाटलं. पण काही आठवड्यांनी पुन्हा फोन आला आणि मी चित्रपटाचा भाग असल्याचं कळलं. माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल मी मनापासून आभारी आहे.”शीतल पाटीलचा अनुभवही असाच आहे. ती म्हणते, “ऑडिशननंतर काहीच होत नाहीये, असंच मला वाटलं होतं. पण अचानक फोन आला आणि लीड रोलसाठी निवड झाल्याचं सांगण्यात आलं. मोठ्या पडद्यावर मुख्य अभिनेत्री म्हणून झळकणं हे माझं स्वप्न होतं, जे ‘रुबाब’मुळे पूर्ण झालं.”या निवडीमागचं कारण स्पष्ट करताना दिग्दर्शक शेखर बापू रणखांबे आणि निर्माते संजय झणकर सांगतात, “सुरुवातीला दोघांनाही नकार मिळाला होता. मात्र शीतलचा चेहरा, डोळे आणि व्यक्तिमत्त्व या भूमिकेसाठी योग्य होतं. वर्कशॉपदरम्यान तिने भूमिका आत्मसात केली. संभाजी आणि शीतल दोघांनीही आपल्या भूमिका प्रभावीपणे साकारल्या आहेत.”झी स्टुडिओज प्रस्तुत आणि झणकर फिल्म्स निर्मित ‘रुबाब’ या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन शेखर बापू रणखांबे यांनी केले असून, संजय झणकर आणि गौरी झणकर हे चित्रपटाचे निर्माते आहेत. उमेश कुमार बन्सल आणि बवेश जानवलेकर यांनी चित्रपटाची प्रस्तुती केली आहे.तरुणाईच्या प्रेमाची, स्वाभिमानाची आणि स्वॅगची गोष्ट मांडणारा ‘रुबाब’ हा चित्रपट ६ फेब्रुवारीपासून सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.