
पुणे–बारामतीच्या भूमीवर आज ‘बजाज पुणे ग्रँड टूर २०२६’ या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. ही स्पर्धा केवळ एक आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा नसून महाराष्ट्राच्या क्रीडा, पर्यटन आणि जागतिक प्रतिमेसाठी एक ऐतिहासिक टप्पा ठरणार आहे. या निमित्ताने जगातील ३५ देशांमधून आलेले आंतरराष्ट्रीय सायकलपटू, प्रशिक्षक, व्यवस्थापक व अधिकारी यांचे मनःपूर्वक स्वागत करण्यात आले.अत्यंत कमी कालावधीत आंतरराष्ट्रीय मानकांनुसार या स्पर्धेची तयारी पूर्ण करणे हे निश्चितच उल्लेखनीय असून, तब्बल ४३७ किलोमीटर लांबीचे मार्ग जागतिक दर्जाच्या सायकलिंग स्पर्धेस अनुरूप विकसित करण्यात आले आहेत. या स्पर्धेमुळे पुणे जिल्हा हा इतिहास, संस्कृती आणि आधुनिकतेचा संगम असल्याचे अधोरेखित होत असून, प्रत्येक किलोमीटरवर शौर्य, परंपरा आणि सांस्कृतिक वारशाच्या कथा अनुभवायला मिळणार आहेत.‘बजाज पुणे ग्रँड टूर २०२६’मुळे पुणे जिल्ह्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर नवी ओळख मिळणार असून, ही स्पर्धा लवकरच जागतिक क्रीडा कॅलेंडरमधील एक प्रतिष्ठेची वार्षिक स्पर्धा बनेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.या स्पर्धेसोबत विविध पूरक उपक्रमही राबवण्यात येणार असून, पर्यटकांना निसर्गसौंदर्यासोबतच छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक किल्ल्यांचे दर्शन घेण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे या ऐतिहासिक सायकलिंग स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन यावेळी सर्व पुणेकरांना करण्यात आले.