
पुणे, दि. 22 :पुणे ग्रँड टूर या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेमुळे पुणे शहर आणि परिसरातील उच्च दर्जाच्या रस्त्यांची चर्चा पुन्हा एकदा केंद्रस्थानी आली आहे. दर्जेदार रस्ते हे केवळ स्पर्धांसाठीच नव्हे तर देशाच्या, राज्याच्या आणि स्थानिक विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचे या निमित्ताने अधोरेखित होत असताना, पुण्यातील राजपथ इन्फ्राकॉन या अग्रगण्य पायाभूत सुविधा कंपनीने रस्ते निर्मिती क्षेत्रात ऐतिहासिक कामगिरी करत जागतिक पातळीवर भारताचे नाव उज्ज्वल केले आहे.आंध्र प्रदेशातील बंगळूर–विजयवाडा इकॉनॉमिक कॉरिडॉर (एनएच–५५४जी) या प्रवेश नियंत्रित ग्रीनफिल्ड राष्ट्रीय महामार्गाच्या पॅकेज २ आणि पॅकेज ३ वर, राजपथ इन्फ्राकॉनने एकाच महामार्गावर, एकाच संस्थेद्वारे, एकाच सलग मोहिमेत सलग चार गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स प्रस्थापित करत पहिलाच असा विश्वविक्रम नोंदवला आहे. ही अभूतपूर्व कामगिरी ५ ते ११ जानेवारी २०२६ या कालावधीत करण्यात आली.यासंदर्भात पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देताना राजपथ इन्फ्राकॉनचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक जगदीश कदम म्हणाले की, “पुट्टपर्थी (आंध्र प्रदेश) परिसरात आम्ही रस्ते बांधकाम क्षेत्रात चार गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स यशस्वीपणे प्रस्थापित केले. यामध्ये २४ तासांत टाकण्यात आलेला सलग सर्वात लांब बिटुमिनस काँक्रीटचा पट्टा (९.६३२ किमी, ३ पदरी), २४ तासांत टाकण्यात आलेले बिटुमिनस काँक्रीटचे सर्वाधिक प्रमाण (१०,६५७ मेट्रिक टन), सलगपणे टाकण्यात आलेला सर्वात लांब बिटुमिनस काँक्रीटचा पट्टा (५२.४१ किमी, ३ पदरी – म्हणजेच १५७ किमी एक पदरी) तसेच सलग टाकण्यात आलेले बिटुमिनस काँक्रीटचे सर्वाधिक प्रमाण (५७,९८२ मेट्रिक टन) यांचा समावेश आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सच्या मूल्यांकन पथकाने या सर्व विक्रमांची पडताळणी करून अधिकृत प्रमाणपत्र दिले आहे.”या विक्रमी मोहिमेसाठी एक सेन्सर पेव्हर (फीडरसह), ५ हॉट-मिक्स प्लांट्स, ७० हायवा टिपर्स, १२ टँडम रोलर्स, ५ न्यूमॅटिक टायर्ड रोलर्स (PTRs) आणि ८०० हून अधिक कर्मचाऱ्यांचे अचूक समन्वय साधण्यात आला. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) यांच्या मार्गदर्शनाखाली, गुणवत्ता, सुरक्षा आणि अभियांत्रिकी मानकांचे काटेकोर पालन करत हा विक्रम साध्य करण्यात आला. आयआयटी मुंबई (स्थापत्य अभियांत्रिकी विभाग) आणि सीओईपी टेक्नॉलॉजिकल विद्यापीठ यांचे तांत्रिक व गुणवत्ता-निरीक्षण सहकार्य या प्रकल्पाला लाभले.याआधीही राजपथ इन्फ्राकॉनने अनेक विक्रम नोंदवले आहेत. मे २०२१ मध्ये सातारा जिल्ह्यात अवघ्या २४ तासांत ३९.६९१ किमी डांबरी रस्ता तयार करत इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये स्थान मिळवले, तर २०२२ मध्ये ‘आझादी का अमृत महोत्सव’ निमित्त अमरावती येथे पहिला गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित केला होता.भारत सरकारच्या भारतमाला परियोजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील बंगळूर–विजयवाडा आर्थिक कॉरिडॉरमुळे दक्षिण आणि पूर्व भारतातील दळणवळण अधिक सक्षम होणार असून, व्यापार, पर्यटन, लॉजिस्टिक्स आणि औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळणार आहे.जगदीश कदम यांनी हा ऐतिहासिक विक्रम ‘विकसित भारत’ या संकल्पनेला समर्पित करत, भगवान श्री सत्य साई बाबा यांच्या जन्मशताब्दी वर्षाला अर्पण केला आहे. “हा केवळ विक्रम नसून, उच्च दर्जाच्या पायाभूत सुविधांच्या अंमलबजावणीसाठी भारताची वाढती क्षमता आणि जागतिक स्तरावर नेतृत्व करण्याची ताकद दर्शवणारा महत्त्वाचा टप्पा आहे,” असेही त्यांनी नमूद केले.